Kiran Mane On Jawan Movie: बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shahrukh Khan) याचा 'जवान' (Jawan) सध्या चित्रपटगृहात गाजत आहे. जवानने बॉक्स ऑफिसवरही चांगलाच गल्ला जमवला आहे. अवघ्या चार दिवसांत जवानने 287 कोटींचा गल्ला जमवला आहे. तर, रविवारी एका दिवसात चित्रपटाने 72 कोटी कमावले होते. जवानचे रिव्ह्यूदेखील चांगलेच गाजत आहेत. अशातच मराठमोळे अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनीही शाहरुखच्या जवानवर एक पोस्ट केली आहे.
शाहरुख खानचे जबरा फॅन असलेल्या किरण माने यांनी चित्रपट पाहिल्यानंतर खास पोस्ट करत चित्रपटाबद्दल आणि शाहरुख खानच्या अभिनयाबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर जवान चित्रपटातील एक व्हिडिओ पोस्ट करत त्यांनी चित्रपटाचा थेट रिव्ह्यूच लिहला आहे. ''जवान'मध्ये शाहरूखच्या आवाजात एक सणसणीत शेर हाय, "उसूलों पे जहाँ आँच आये, टकराना जरूरी है...जो जिन्दा हों, तो फिर ज़िन्दा नज़र आना ज़रूरी है !"' अशी सुरुवात किरण माने यांनी आपल्या पोस्टमध्ये केली आहे.
'हा शेर आजच्या परिस्थितीत लै लै लै मोलाचा संदेश देऊन जातो भावांनो. जवा-जवा आपल्यावर दडपशाहीचं सावट येतं. आपल्या पूर्वजांनी झगडून, लढा देऊन मिळवलेलं, आपलं व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य हिरावून घेतलं जातं... आपल्यावर पिढ्या न् पिढ्या असलेल्या मानवतेच्या, समानतेच्या, बंधुभावाच्या संस्कारांवर घाला घातला जातो... तवा बिनधास्त नडायला पायजे, भिडायला पायजे... 'टकराना ज़रूरी है' ! तोच आपल्या जिवंत असल्याचा पुरावा असतो. नायतर सगळं सहन करत, मुकाट जगनं मुडद्यापेक्षा बदतर असतं,' असं किरण माने यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहलं आहे.
'शायरीच्या दुनियेत बेताज बाहशाह असलेल्या वसीम बरेलवींचा एक दिवस फोन वाजला, "हॅलो, वसीमजी, मी शाहरूख खान बोलतोय. तुमचा हा शेर मला कायम प्रेरणा देतो. यावेळी तो माझ्या सिनेमात वापरायला मला तुमची परवानगी हवीय." वसीमभाई म्हन्ले,"शाहरूख बेटा, तू मला आवडतोस. परवानगी देईन, पण एका अटीवर. हा शेर मी लिहून देईन, तसाच्या तसा सिनेमात तू तुझ्या आवाजात म्हणायचास." शाहरूखनं नम्रपणे हसून होकार दिला. दोन ओळींसाठी एवढा मोठ्ठा कलाकार स्वत: फोन करून विनयशीलतेनं परवानगी मागतो याचं बरेलवींना लैच नवल वाटलं,' असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे.
किरण माने पुढे म्हणतात की, 'खरंतर ज्यांना शाहरूखचं अफाट वाचन, तीक्ष्ण बुद्धीमत्ता, विवेकी विचारसरणी, समाजभान याविषयी माहिती आहे, त्यांना या गोष्टीचं लै नवल वाटनार नाय. असे कलावंतच न डरता, मागे न हटता, पाठीचा कणा ताठ ठेवून जगतात. नायतर बाकी आज आपल्या सिनेमाक्षेत्रात बहुसंख्य कलाकार सिस्टीमच्या ताटाखालची मांजरं झालीत. फायद्यासाठी व्यवस्थेचे पाय चाटत लाचार जगणार्या. जातीधर्मांत द्वेषाचं विष पसरेल असा इतिहासाचा विपर्यास करणारे सिनेमे काढणार्या. भ्रष्ट नेत्यांकडून फंडिंग उकळत प्रोपोगंडा फिल्मस् काढणार्या सुमार दर्जाच्या कलाकारांची मराठी-हिंदीत सद्दी आहे. अशा नट-दिग्दर्शकांची ठरवून 'हाईप' केली जाते. पात्रता नसताना अनेक सरकारी पुरस्कार, पदं देऊन प्रेक्षकांवर लादलं जातं. हे पाहून कवा-कवा निराशा यायची. अशा भंपकांना प्रेक्षक वैतागत का नाहीत? असा प्रश्न पडायचा,' असंही किरण माने यांनी म्हटलं आहे.
'पण प्रेक्षक येडे नसतात. पितळ आनि सोनं, काच आणि हिरा यातला फरक कळतो त्यांना. म्हणूनच त्यांनी 'जवान'ला ठरवून डोक्यावर घेतलं. शाहरूख खान नावाच्या अस्सल भारतीय कलावंताला भरभरून प्रेम देऊन प्रेक्षकांनी हे दाखवून दिलं की, बास झालं आता. आम्हाला मूर्ख समजू नका... 'हम जिन्दा है... और ज़िन्दा नज़र आना चाहते है,' असं म्हणत किरण माने यांनी शाहरुखच्या जवानचे भरभरुन कौतुक केले आहे.