'जुनं फर्निचर' पाहिल्यानंतर किरण मानेंनी महेश मांजरेकरांना केला फोन, म्हणाले 'तुम्ही या रोलसाठी नाना पाटेकरांना...'

या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी महेश मांजरेकरांच्या जुनं फर्निचर चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. 

नम्रता पाटील | Updated: May 12, 2024, 03:24 PM IST
'जुनं फर्निचर' पाहिल्यानंतर किरण मानेंनी महेश मांजरेकरांना केला फोन, म्हणाले 'तुम्ही या रोलसाठी नाना पाटेकरांना...' title=

Kiran Mane Post Juna Furniture Marathi Movie : महेश मांजरेकर लिखित-दिग्दर्शित जुनं फर्निचर हा चित्रपट 26 एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळताना दिसत आहे.  या चित्रपटात आपले आई-वडील मुलांप्रती असलेली सगळी कर्तव्य चोख बजावतात; पण तीच सगळी कर्तव्यं आई-वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात का? अशा अनेक प्रश्नांबद्दल यात उत्तरे देण्यात आली आहेत. आता या चित्रपटाबद्दल अभिनेते किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

किरण माने यांनी फेसबुकला एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत त्यांनी महेश मांजरेकरांच्या चित्रपटातील एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी महेश मांजरेकरांच्या जुनं फर्निचर चित्रपटाबद्दल भाष्य केले आहे. 

किरण माने यांची पोस्ट

...बाकी निवडणूक, प्रचार सुरू राहील... मतदान करायलाच हवं... पण या सगळ्यातनं आवर्जुन वेळ काढून 'जुनं फर्निचर' हा अप्रतिम सिनेमा पहाणं चुकवू नका ! एकतर मराठीत खुप सकस, आशयघन कलाकृती येत नाहीत. काही चांगल्या कथानकामध्ये सुमार किंवा भुमिकेला सुट न होणारे 'सो काॅल्ड' सुपरस्टार नट घेऊन सिनेमाची वाट लावलेली असते तर काही सिनेमात नट दिग्दर्शक चांगले असून कथानकाची बोंब असते.

अशा परिस्थितीत एक अतिशय जबरदस्त कथा... क्षणभरही लक्ष विचलीत न होऊ देणारी पटकथा... काळजाला भिडणारे संवाद... मराठीत दुर्मिळ असणारे परफेक्ट कास्टिंग, सगळ्यांचाच अप्रतिम अभिनय... कॅमेरा, पार्श्वसंगीत...सगळं सगळं अफलातून असलेला हा सिनेमा पहाताना मी हरवून गेलो... हसलो, घुसमटलो, रडलो, विचारप्रवृत्त झालो... शेवटी खुप समृद्ध करणारं काहीतरी घेऊन बाहेर पडलो ! काल रात्री पाहिलेला सिनेमा आजही माझी पाठ सोडत नाही... मराठी सिनेमाच्या बाबतीत हा अनुभव आजकाल दुर्मिळ झाला आहे. 

महेश मांजरेकर यांनी अभिनेता म्हणून अख्खा सिनेमा समर्थपणे खांद्यावर उचलून धरला आहे. त्यांची एकेक भावमुद्रा... देहबोली... आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे अफलातून संवादफेक... थक्क करुन टाकते. अभिनेता म्हणून खूप दिवसांनी मराठीत कुणाचा अभिनय बघताना मी एवढा भारावून गेलो ! मांजरेकरांना मी फोन करून म्हणालो की, "एका बाबतीत तुमचे खुप आभार की तुम्ही या रोलसाठी नाना पाटेकरांना घेतले नाही." खरंच आहे. वरवर स्क्रीप्ट वाचताना नक्कीच नाना डोळ्यांपुढे आले असणार. पण महेश मांजरेकरांनी गोविंद पाठक जसा नखशिखान्त उभा केलाय तसं क्वचितच कुणी या उंचीला पोहोचलं असतं.

सिनेमाच्या कथेबद्दल फार काही सांगत नाही. पण मध्यमवर्गीय असूनही ऐपतीच्या बाहेर जाऊन एक बाप आपल्या एकुलत्या एका मुलाला लाडात वाढवतो, हवं ते करायची मुभा देतो,शिकवतो... पण उतारवयात मुलगा मात्र आईबापाला परकं करतो... या वेदनेनं अस्वस्थ झालेला बाप, आपल्या आएएस अधिकारी असलेल्या पोराला कोर्टात खेचतो आणि त्याच्या संगोपनाच्या वेळी झालेल्या तब्बल ४ कोटी ७२ लाख ८६ हजार शंभर रुपये इतक्या भरपाईची मागणी करतो ! एवढंच तुम्हाला सांगतो.

'जुनं फर्निचर' हा सिनेमा आवर्जुन बघा. सिनेमागृहात जाऊन बघा. घरी आल्यावर आपल्या आईवडिलांशी तुमचं वागणं बदलेल हे नक्की. मराठीला एक नितांतसुंदर कलाकृती दिल्याबद्दल लब्यू महेशजी... आणि कडकडीत सलाम !, असे किरण माने यांनी म्हटले. 

दरम्यान सत्य - सई फिल्म्स आणि स्कायलिंक एंटरटेनमेंट प्रस्तुत 'जुनं फर्निचर' हा चित्रपट 26 एप्रिलला प्रदर्शित झाला. हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांवर भाष्य करणारा आहे. या चित्रपटात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर,  समीर धर्माधिकरी, डॉ. गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे हे कलाकार प्रमुख भूमिकेत झळकत आहे. या चित्रपटाची कथा, पटकथा, संवाद आणि दिग्दर्शन महेश वामन मांजरेकर यांनी केले आहे. तर यतिन जाधव हे 'जुनं फर्निचर'चे निर्माते आहेत.