मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी कुमार सानूंचा माफीनामा

मुलाच्या चुकीच्या वक्तव्यामुळे मागावी लागली माफी 

Updated: Oct 29, 2020, 04:56 PM IST
मराठी भाषेचा अपमान केल्याप्रकरणी कुमार सानूंचा माफीनामा

मुंबई : जान कुमार सानू याने मराठी भाषेबद्दल व्यक्त केलेल्या अत्यंत आक्षेपाहार्य विधानानंतर संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट निर्माण झाली. आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स चॅनल ला  शिवसेना स्टाईल आंदोलन करू असा सज्जड दम दिल्या नंतर ताबडतोप कलर्स चॅनलनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून माफी मागितली व यापुढे असे होणार नाही असे वचन दिले.

काल रात्री बिग बॉस चा होस्ट सलमान खान याने सुद्धा या संदर्भात शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर जान कुमार सानुला योग्य ती समझ दिली आणि त्या नंतर ताबडतोप जान सानू ने याबाबत चॅनल वर येऊन जाहीर माफी मागितली.

आज जान कुमार सानू याचे वडील व आघाडीचे गायक कुमार सानू यांनी सुद्धा मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे व आमदार प्रताप सरनाईक यांची जाहीर माफ मागितली आहे. इतकच नव्हे तर त्यांनी महाराष्ट्र, बाळासाहेब यांच्याशी त्यांच्या असलेल्या संबंधांना उजाळा देत आम्ही जे काही आहोत ते या महाराष्ट्र आणि मराठी माती मुळे आहोत अशी कृतज्ञता व्यक्त केली व त्यांच्या मुला कडून झालेल्या मराठी भाषेच्या अवमाना बद्दल त्यांनी तीव्र नापसंती व्यक्त केली.

 बिग बॉसमधील १४ व्या सीझनचा स्पर्धक जान कुमार सानू याला मनसेपाठोपाठ आता शिवसेनेकडून इशारा देण्यात आला आहे. शिवसेनेचे नेते आमदार प्रताप सरनाईक यांनी आपण शिवसेना स्टाईल दाखवू असा इशारा दिला होता. घरातील स्पर्धक आणि प्रसिद्ध गायक कुमार सानूचा मुलगा जान कुमार सानूने,'मला मराठीची चीड येते', असे म्हणत मराठी भाषेचा अपमान केला आहे., मुजोर जान कुमार सानू याची या मालिकेतून हकालपट्टी केली नाही, तर सेटवर येऊन शिवसेना आपल्या पद्धतीने आंदोलन करेल, असा सज्जड इशारा शिवसेना प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी कलर्स वाहिनीला दिला.