'या' मालिकेने पूर्ण केले 500 नाबाद एपिसोड

मालिका अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीला 

'या' मालिकेने पूर्ण केले 500 नाबाद एपिसोड

मुंबई : ‘लाखात एक आपला फौजी’ असं म्हणायला लावणाऱ्या ‘लागीरं झालं जी’ या ‘झी मराठी’ वरील मालिकेने गेल्या दीड वर्षामध्ये संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात घर केलं आहे. या मालिकेत आपल्या घरातीलच वाटावा असा युवक, म्हणजे अजिंक्य शिंदे याचा एका सामान्य मुलापासून फौजी होण्याचा प्रवास पूर्ण होताना दाखवला आहे. आर्मीचं प्रशिक्षण घेण्यासाठी नऊ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो. तेवढाच कालावधी अजिंक्यच्या जडणघडणीसाठी मालिकेमध्ये लागला आहे. तर नऊ दहा महिन्याचं आर्मी ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर मुलं देशसेवेची शप्पथ घेतात आणि खऱ्या अर्थानं फौजी बनतात.

हा शप्पथ घेण्याचा अभूतपूर्व सोहळा ‘कसम परेड’ या नावानं ओळखला जातो. हा सोहळा फक्त फौजींच्या कुटुंबीयांनाच अनुभवायला मिळतो. पण लागीर झालं जी या मालिकेमुळे प्रेक्षकांना हा कसम परेडचा सोहळा देखील पाहायला मिळाला.

अज्या आणि शीतली सोबतच या मालिकेतील सर्व पात्र प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करत आहेत. शीतल आणि अजिंक्यच लग्न झाल्यानंतर संसार आणि भारत मातेची सेवा यामध्ये त्या दोघांची चालली तारेवरची कसरत प्रेक्षक पाहत आहेत. प्रेक्षकांचं प्रेम आणि पाठिंबा यामुळे मालिकेने नुकताच ५०० भागांचा यशस्वी टप्पा पार पडला. हा मैलाचा दगड पार केल्याचा आनंद या संपूर्ण टीमने दणक्यात साजरा केला. सर्व कलाकार यांनी एकत्र येऊन हे सेलिब्रेशन एन्जॉय केलं.

५०० भाग पूर्ण केल्याचा आनंद व्यक्त करताना शीतल म्हणजेच अभिनेत्री शिवानी बावकर म्हणाली, "मी सर्वप्रथम माझ्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करू इच्छिते. प्रेक्षकांचे प्रेम आणि आशीर्वाद सदैव आमच्यासोबत असंच राहू दे. मला या मालिकेचा एक महत्वाचा हिस्सा बनवल्याबद्दल मी माझ्या संपूर्ण 'लागीर झालं जी'च्या टीमची आभारी आहे."

अजिंक्य म्हणजेच नितीश चव्हाण म्हणाला, "मला खूप आनंद होतोय की 'लगीर झालं जी' या मालिकेने ५०० भाग पूर्ण केले. यात संपूर्ण टीमच श्रेय आहे. प्रेक्षकांचं आमच्यावरच प्रेम दिवसागणिक वाढत जावं अशी मी प्रार्थना करतो. हा एक सुंदर प्रवास आहे आणि मला आशा आहे की आम्ही असेच अनेक टप्पे पार करू."