मुंबई : अभिनेत्री पूजा सावंत स्टारर 'लपाछपी' हा भयपट आज प्रदर्शित झालाय. विशाल फुरिया यांचं दिग्दर्शित या सिनेमात पूजा सावंतसोबतच अभिनेत्री उषा नाईक, विक्रम गायकवाड यांच्या मुख्य भूमिका आहेत. कसा आहे लपाछपी.. हा सिनेमा तुमचे पैसे वसूल करणार का, काय आहे या सिनेमाची ट्रु स्टोरी...घ्या जाणून...
दिग्दर्शक विशाल फुरिया यांचा लपाछपी हा दिग्दर्शक म्हणून पहिलाच सिनेमा आहे. ही गोष्ट आहे नेहाची. 8 महिन्यांची गरोदर नेहा आपल्या पतीसोबत काही कारणांनी एका गावात येउन राहते. या गावात तिला खूपच वेगळे आणि विचित्र अनुभव येतात. अचानक काही चेहरे तिला दिसतात, जे तिच्याशी संवादही साधतात. यामागचं रहस्य काय, काय आहे सस्पेन्स यासाठी तुम्हाला लपाछपी हा सिनेमा पहावा लागेल..
सिनेमाचा पूर्वार्ध खूप छान झालाय. पुढे काय घडणार, ही उत्सुकता तुम्हाला सतत खिळवून ठेवते. भयपट असल्यामुळे, तुम्हाला घाबरवण्याची दिग्दर्शकानं एकही संधी सोडलेली नाही. अचानक दिसणारे चेहरे, किंकाळ्या फोडून प्रेक्षकांना घाबरवायचं काम दिग्दर्शकाला चांगलच जमलंय. लपाछपीचा उत्तरार्ध मात्र फसलाय. इंटलवलच्या आधी तुम्हाला खूपच उत्सुकता लागते की पुढे काय घडणार, मात्र ते रहस्य कळल्यावर एकतर ते पुर्णपणे कळत नाही आणि दुसरं म्हणजे कळूनही वळत नाही.. हे रहस्य कळल्यावर ते पचवणं कठीणही जातं.
'लपाछपी' या सिनेमाचा बॅकग्राउंड स्कोर आणि सिनेमाटोग्राफी कमाल झालीये.. खरंतर या दोनच गोष्टी प्रेक्षकांना घाबरवायला पुरेसे आहेत.. अभिनेत्री पूजा सावंतचा अभिनय छान झालाय. फॉर अ चेंज तिला खरंच एक चांगला ब्रेक मिळालाय. 'लपाछपी' या सिनेमातले हे सगळे फॅक्टर्स पाहता या सिनेमाला मिळतायत 3 स्टार्स.