Leaders : खोटे दागिने विकणाऱ्या अभिनेत्याच्या नशिबाला आज सोन्याहूनही अधिक झळाळी

पाहा त्यानं किती खडतर दिवस पाहिलेले.... 

Updated: Nov 3, 2021, 06:19 PM IST
Leaders : खोटे दागिने विकणाऱ्या अभिनेत्याच्या नशिबाला आज सोन्याहूनही अधिक झळाळी title=
प्रतिकात्मक छायाचित्र

नवी दिल्ली : प्रसिद्धी, लोकप्रियता, यश हे आयुष्यासोबतच समांतर रेषेत चालत असणं फारच कमी व्यक्तींसोबत घडतं. अनेकांनाच या साऱ्यासाठी अथक परिश्रम करावे लागतात. काही अशी कामंही करावी लागतात ज्याची अपेक्षाही केली नसावी. पण, नियतीच्या पुढे कोणंचं काहीच चालेना या एकाच ओळीला आठवून, 'ये भी सही' हीच काही व्यक्तींची भूमिका असते. 

लोकप्रियता आणि यशाची अशीच पहाट पाहण्यापूर्वी एका धडाडीच्या अभिनेत्याला काहीसा अंधकार पहावा लागला होता. बॉलिवूडमध्ये नावारुपास येण्यापूर्वी शेफ आणि वेटरच्या रुपात काम करणारा हा अभिनेता आहे अक्षय कुमार. (Akshay Kumar)

आगामी चित्रपटाच्या निमित्तानं सध्या तो विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहे. अशाच एका कार्यक्रमात म्हणजेच KBC 13 मध्ये आलं असताना त्यानं संघर्षाच्या काळातील दिवस आठवले. 

'मी दिल्लीतून कुंदन असणारे दागिने 7 ते 10 हजार रुपयांना खरेदी करायचो आणि मुंबईत ते विकायचो. असं करत असताना मला जवळपास 11 ते 12 हजार रुपयांचा फायदा होत होता. मी साधारण 3-4 वर्षांसाठी हे सारं करत होतो', असं त्याने सांगितलं. 

अक्षय शेफ होता, त्यावेळी तो जिलेबी, छोले भटुरे, समोसे बनवून विकत होता. खाण्याचा टेबल व्यवस्थित आहे की नाही याचीही तो काळजी घेत होता. काम करत असण्याच्या ठिकाणी एक भींत असल्याचं सांगत तिथं आपण चार फोटो लावले होते याचा उलगडाही त्यानं केला. 

अमिताभ बच्चन, जॅकी चॅन, श्रीदेवी आणि सिल्वेस्टर स्टेलॉन ही ती चार नामवंत व्यक्तिमत्त्वं. ज्या चौघांना डोळ्यासमोर ठेवून खिलाडी कुमार घडत गेला त्याच चौघांसोबत त्यानं स्क्रीनही शेअर केली. 

स्वप्नातही असं काही होईल याची खुद्द अक्षयनं अपेक्षाही केली नव्हती. पण, त्याच्या मेहनतीनं एक दिवस त्याला अशा टप्प्यावर आणून ठेवलं जिथून सारं चित्रच समाधानकारक दिसत होतं.