'सतत झगडत राहिलास खरा पण...', भावाच्या निधनानं बिनधास्त माधुरी पवार खचली

Madhuri Pawar Brother's Death : माधुरी पवारच्या भावाचे निधन झाले आहे. तिच्या भावाच्या स्मरणात एक पोस्ट शेअर केली असून सोशल मीडियावर तिचे चाहते तिच्या भावाला श्रद्धांजली वाहत आहेत. 

दिक्षा पाटील | Updated: Oct 12, 2023, 01:07 PM IST
'सतत झगडत राहिलास खरा पण...', भावाच्या निधनानं बिनधास्त माधुरी पवार खचली title=
(Photo Credit : Social Media)

Madhuri Pawar Brother's Death : छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' या लोकप्रिय मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री माधुरी पवार आणि तिच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. माधुरीच्या भावाचे 12 दिवसांपूर्वी निधन झाले. तिच्या भावाचे नाव अक्षय असे होते. अक्षयच्या निधनाच्या 12 दिवसानंतर आता माधुरीनं सोशल मीडियावर एक भावून पोस्ट शेअर केली आहे. 

भावूक होत माधुरी म्हणाली...

माधुरीनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये माधुरी म्हणाली की "प्रिय अक्षय, तुला जाऊन 12 दिवस झाले... हे शब्दात व्यक्त करायची वेळ आली यासारखं दुर्दैव नाही... नियतीच्या मनात नेमकं काय चालू आहे हे कुणी सांगू शकत नाही. उद्याचा दिवस कोणी पाहिलाय असं आपण बऱ्याचदा म्हणतो. खरंच उद्याचा दिवस पाहता आला असता तर मी माझ्या आयुष्यात माझ्या भावाच्या बाबतीत अचानकपणे घडलेली दुखःद घटना घडण्यापासून थांबवू शकले असते. तुझ्या असण्याची इतकी सवय झाली आहे ना की, तू नाहीयेस ही कल्पनाच सहन होत नाहीये. माझ्या आयुष्याच्या प्रत्येक वाटचालीत तुझी साथ होती, मग माझे इव्हेंट्स असो किंवा काही, तू माझ्याबरोबर असायचास, बऱ्याचवेळा माझ्या वतीने माझ्या अनुपस्थितीत आपलं घर सांभाळलंस, घरच्यांना सांभाळलंस, त्यांची काळजी घेतलीस. मला तुझा खूप आधार वाटायचा. स्वयंपाकाची आवड असल्यामुळे आपलं हॉटेल सुरू करायचं तुझं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं होतं ना. तू कोणालाही कधी 'नाही' असं बोलला नाहीस. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी उभा राहिलास, कुठल्याही कामाला कमी लेखलं नाहीस, कुटुंबासाठी, मित्रांसाठी सदैव उभा राहिलास, आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबरोबर तू आपलेपणाचं नातं तयार केलं होतंस. कुठल्याही स्त्रीचा अनादर केला नाहीस, स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी सतत झगडत राहिलास खरा पण कायम स्वतःपेक्षा बहिणींच्या कामाला प्राधान्य दिलंस, या तुझ्यातील सर्व गुणांचा मला अभिमान होता आणि कायम असेल."

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

 

भावाचं स्वप्न साकारण्यासाठी माधुरी करणार मेहनत!

पुढे आणखी एक स्लाईड असून त्यात माधुरी म्हणाली, "तुझ्या हसऱ्या चेहऱ्यामुळे मला काम करण्यासाठी वेगळी उर्जा मिळायची. बहिणींच्या प्रेमापोटी तुला भाऊ म्हणून जे-जे करणं शक्य होतं ते तू केलंस. आई-बाबांचे संस्कार आणि आमच्या दोघांमधला समजूतदारपणा यामुळे आमच्यात कधी भांडणं झालीच नाहीत. तू माझा लाडका होतास आणि कायम राहशील. गेली अनेक वर्षे रक्षाबंधन आणि भाऊबीज आपण उत्साहात साजरी करायचो, यंदाचे रक्षाबंधनाचे तुझ्यासोबतचे क्षण आठवत आहेत, पण येत्या दिवाळीतील भाऊबीज आठवून जास्त त्रास होतोय... एका सावलीसारखा माझ्या सोबत असायचास, पुढच्या प्रवासात तुझ्याशिवाय जगायची सवय कशी करून घेऊ? माझा नेहमी अट्टहास असायचा की अक्षय तुला जे काही पाहिजे ते जगाकडे मागण्याऐवजी माझ्याकडे माग. आजही तुला खूप काही द्यावंसं वाटतंय, तुझ्या इच्छा पूर्ण कराव्याश्या वाटत आहेत आणि मी ते नक्की करेन. मी नक्कीच गेल्या जन्मी पुण्य केलं असणार म्हणून या जन्मी मला तुझ्यासारखा भाऊ मिळाला पण तुझ्यासोबत आयुष्य अजून जास्त जगायला नक्कीच आनंद झाला असता... जिथे कुठे असशील तिथे देखील सगळ्यांना हसत खेळत ठेवशील याची मला खात्री आहे. माझ्या करिअरमध्ये तुझा सर्वात जास्त मोलाचा वाटा होता, मला एका मोठ्या उंचीवर तुला पाहायचं होतं, तुझी ही इच्छा पूर्ण करण्यासाठी मी नक्की अजून मेहनत घेईन आणि कामाची जोमाने सुरुवात करेन. तुझी साथ, तुझं प्रेम, तुझा पाठिंबा माझ्या पाठीशी तसाच कायम ठेव! पण तुझी उणीव माझ्या मनात आणि आयुष्यात कायम राहणार अक्षू.."

हेही वाचा : काही म्हणा माझा गुन्हा! असं का म्हणते सोनाली कुलकर्णी?

माधुरीनं पुढे एक श्लोक कॅप्शनमध्ये दिला आहे. माधुरी म्हणाली, 'पुत्रनाशे वित्तनाशे ज्ञातिसम्बन्धिनामपि।प्राप्यते सुमहद् दुःखं दावाग्निप्रतिमं विभो। दैवायत्तमिदं सर्वे सुखदुःखे भवाभवौ।।' तर माधुरीच्या भावाचे निधन कशामुळे झाले हे अजून समोर आलेले नाही. 

कोण आहे माधुरी?

माधुरी ही एक अभिनेत्री असण्यासोबतच डान्सर देखील आहे. 'अप्सरा आली' या डान्स रिअॅलिटी शोची ती विजेती होती. माधुरीला 'देवमाणूस' या मालिकेतून घराघरात ओळख मिळाली. तर तिचा लंडन मिसळ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.