मुंबई : काही मालिकांना प्रेक्षकांच्या जीवनात असं काही स्थान मिळतं जे पाहता त्या मालिकांचा आणि त्यातील कलाकारांचा वेळोवेळी हेवा वाटतो. अशाच काही मालिकांच्या गर्दीत बऱ्याच वर्षांपूर्वी महाभारत प्रेक्षकांच्या भेटीला आलं. महाकाव्यातील पात्र छोट्या पडद्याच्या निमित्ताने सर्वांच्या भेटीला आली आणि पाहता पाहता त्यांना प्रेक्षकांनी आपल्यातीलच स्थान दिलं. अशाच मालिकेतून 'द्रौपदी' साकारणारी अभिनेत्री रुपा गांगुली यांनाही असा अनुभव आला.
तिने साकारलेली द्रौपदी खऱ्या अर्थाने कारकिर्दीला कलाटणी देऊन गेली होती. रुपा या नावापेक्षा त्या द्रौपदी म्हणूनच जास्त ओळखल्या गेल्या. याच भूमिकेच्या बळावर त्यांना पाहून अनेकदा जाहीजण भावूकही होत असत. ही जणू काही त्यांनी साकारलेल्या भूमिकेची पोचपावतीच होती. अशा या अभिनेत्रीचा २५ नोव्हेंबरला वाढदिवस.
सध्याच्या घडीला राजकीय पटलावर भाजप नेतेपदी असणाऱ्या रुपा यांचा कोलकात्यातील कल्याणी येथे जन्म झाला होता. तेथूनच शाळा आणि महाविद्यालयीन शिक्षणानंतर त्यांनी अभिनयाची वाट निवडली. 'गणदेवता' या मालिकेतील त्यांचं काम पाहिल्यानंतरच बीआर चोप्रा यांनी त्यांना द्रौपदी साकारण्याचा प्रस्ताव पुढे केला होता.
अरेच्चा! ही तर हुबेहूब मधुबाला....
'द्रौपदी' या पात्रामुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचलेल्या रुपा गांगुली यांनी पुढे चित्रपटांमध्येही आपल्या कारकिर्दीवर पकड मिळवली. बंगाली आणि हिंदी चित्रपटांचा प्रस्ताव त्यांना मिळाला. गौतम घोष यांच्या पुरस्कार विजेत्या 'पोद्मा नोदीर माझी', रितुपर्णा घोष यांचा 'अंतरमहल' या चित्रपटांसोबतच 'बहार आने तक', 'साहेब', 'एक दिन अचानक', 'प्यार का देवता', 'सौगंध', 'निश्चय' आणि 'बर्फी' असा चित्रपटांतून त्या झळकल्या.
फक्त अभिनयच नव्हे, तर पार्श्वगायनातही रुपा गांगुली यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. अदिती रॉयच्या 'अबोशेशे' या चित्रपटातील गीतासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकेचा पुरस्कार मिळाला होता.