मुंबई : देशात कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढताना दिसत आहे. गेल्या दोन महिन्यांपासून कोरोना व्हायरसमुळे देशाला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यात या महामारीचा सर्वात मोठा फटका हातावरपोट असणाऱ्या कामगारांना बसला आहे. हाती काम नसल्यामुळे त्यांनी आपल्या राज्यात परतण्याचा निर्णय घेतला आहे. या मजुरांना त्यांची गावी पोहोचवण्यासाठी महानायक अमिताभ बच्चन यांनी पुढाकार घेतला आहे. मुंबईतील मजुरांना उत्तर प्रदेशला पाठवण्यासाठी त्यांनी चक्क विमानांची व्यवस्था केली आहे.
बिग बींनी ७०० मजुरांना त्यांच्या गावी पोहोचवण्यासाठी ४ विशेष विमानांची व्यवस्था केली आहे. या चार विमानांनी बुधवारी उत्तर प्रदेशच्या दिशेने उड्डाण भरले आहे. त्याचप्रमाणे आज दोन विमान उत्तर प्रदेशच्या दिशेने उड्डाण भरणार आहे. बिग बींच्या वतीने एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव गरजूंना मदत करत आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईहून अलाहाबाद, गोरखपूर आणि वाराणसीसाठी निघालेल्या विमानाच्या माध्यमातून १८० मजुरांनी उड्डाण केले. यापूर्वी बच्चन यांनी ३०० मजुरांना उत्तर प्रदेशमध्ये पोहोचता यावे म्हणून १० बस पाठवल्या होत्या. लखनऊ, अलाहाबाद आणि उत्तर प्रदेशातील इतर ठिकाणी या बस पाठवण्यात आल्या होत्या.
एबी कॉर्प लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक राजेश यादव आणि हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने हे कार्य सुरू आहे. हाजी आली ट्रस्ट आणि पीर मखदूम साहेब ट्रस्टच्या मदतीने बिग बींनी दररोज शिजवलेल्या पॅकेटचे वाटप देखील सुरू केले आहे. दररोज तब्बल ४ हजार ५०० शिजवलेल्या अन्नाचे पॅकेट वाटले जात आहेत.
त्यांनी मजुरांना गावी पोहोचवण्यासाठी देखील प्रचंड मदत केली आहे. बिग बींशिवाय अभिनेता सोनू सुदचं या कामात मोलाचं योगदान आहे. चित्रपटांमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा सोनू श्रमिकांसाठी मात्र हिरो ठरला आहे.