Maharashtrachi Hasyajatra Dattu More Wedding : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमानं सगळ्या प्रेक्षकांना प्रचंड हसवलं आहे. आजही प्रेक्षकांना हा शो पाहण्याची उत्सुकता काही कमी झालेली नाही. या कार्यक्रमातील कलाकार त्यांच्या कामासोबतच त्यांच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. नुकतीच पृथ्वीकनं एक मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यानं प्रेक्षकांना त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या स्ट्रगलविषयी सांगितलं तर दुसरीकडे आपल्या सगळ्यांचा लाडका दत्तू मोरे नुकताच लग्न बंधनात अडकला. त्याच्या पत्नीनं नुकतीच वटपौर्णिमा साजरी केली. आता त्या दोघांनी त्यांचं लग्न कसं झालं आणि त्यांनी अचानक हा निर्णय कसा घेतला या विषयी सांगितलं आहे.
दत्तू मोरे आणि त्याची पत्नी स्वाती घुनागे या दोघांनी इट्स मज्जाला नुकतीच ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत स्वाती आणि दत्तूनं त्यांच्या लग्नाची संपूर्ण गोष्ट सांगितली आहे. स्वातीनं यावेळी सांगितलं की "जेव्हा मी घरी सांगितलं तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटलं होत. पण तिच्या आईनं लगेच होकार दिला होता. मात्र, बाबा लग्नासाठी तयार नव्हते. जोपर्यंत ते दत्तूला भेटले नाही तोपर्यंत हे सुरुच होतं. त्याचं फक्त एकच कारण होतं आणि ते म्हणजे माझ्या घरात सगळेच डॉक्टर आहेत. त्यामुळे त्यांना होणारा जावई देखील डॉक्टर हवा होता. पण जेव्हा त्यांना दत्तू भेटला त्यानंतर त्यांनी लग्नासाठी होकार दिला."
स्वातीच्या वडिलांना भेटल्यानंतर नेमकं काय केलं हे सांगत दत्तू म्हणाला, "मी स्वातीच्या वडिलांना समजुत घालण्याचा प्रयत्न केला. त्यांना समजावलं की पळून जाणं ही गोष्ट आपल्याला काही शोभणार नाही. तुम्हाला माझ्याकडून काय अपेक्षित आहे ते मला सांगा. मला कोणत्याही गोष्टीच व्यसन नाही. डॉक्टर आणि अॅक्टर यांच्यातील फरक हा विषय असेल, तर तुमच्या काय अपेत्रा आहेत ते मला सांगा. त्यानंतर त्यांनी थोडा विचार केला आणि स्वातीने देखील त्यांना समजावलं. इतकंच काय तर दत्तू पुढे म्हणाला की स्वातीचे वडील होकार देण्याच्या बाजून विचार करत होते हे त्याला कळत होतं. त्यांनी थोडा वेळ घेतला आणि त्यानंतर कोणतीही अट न ठेवता त्यांनी लग्नाला होकार दिला."
हेही वाचा : "चार चित्रपट केले तरी काम मिळत नव्हत म्हणून मी...", 'हास्यजत्रा' फेम अभिनेत्याचा मोठा खुलासा
दत्तूच्या आई-वडिलांची त्याच्या लव्ह मॅरेजवर कशी प्रतिक्रिया होती हे सांगत, म्हणाला "लव्ह मॅरेज म्हटलं की आपल्याकडे हा खूप मोठा प्रॉबलम आहे. त्यामुळे मी सगळ्यात आधी माझ्या लग्नाविषयी आईला सांगितलं आणि लग्नाच्या 10-12 दिवस आधी बाबांना सांगितलं. कारण त्यावर ते भडकणार हे मला माहित होतं. तर आईला आधीच सांगण्याचं कारण म्हणजे ती तर आपल्या बाजूनं असेल हे माहित होतं. खरंतर आईला स्वातीशी मी लग्न करण्यावर काही अडचण नव्हती फक्त तिला अडचण होती ती समाज लव्ह मॅरेवर काय बोलेल, या कारणामुळे ती नकार देत होती. मग माझ्या तीन बहिणींनी तिला समजावलं आणि त्या चक्क 10-15 दिवसात आईला फोन करून हा विषय काढायच्या आणि तिला समजावण्याचा प्रयत्न करायच्या. त्यानंतर तिनं लग्नासाठी होकार दिला"