Rohit Mane on Benya : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. त्या चाहत्यांमध्ये फक्त मराठी नाही तर महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांची सुद्धा खूप जास्त संख्या आहे. या कार्यक्रमातील प्रत्येक कलाकाराचं काही ना काही एक युनिक गोष्ट असते. ही त्या कलाकाराची गोष्ट हायलाईट करते. त्या गोष्टीचा उल्लेख निघाला की प्रत्येक प्रेक्षकासमोर तो कलाकार जणू उभा राहतो. असाच एक शब्द आहे 'बेन्या'. रोहित माने या अभिनेत्याचा 'हास्यजत्रेत' सातारी स्वॅग आपल्याला पाहायला मिळतो. अशात त्याचा 'बेन्या' हा शब्द चांगलाच गाजलेला आहे. त्याचा अर्थ काय याविषयी त्यांनं नुकतीच 'झी 24 तास'ला मुलाखत दिली होती. त्यावेळी सांगितलं आहे.
रोहितला या मुलाखतीत प्रश्न विचारण्यात आला की 'तुझ्या स्किट्समध्ये अनेकदा बेन्या हा शब्द ऐकायला येतो. त्याचा अर्थ काय?' त्यावर उत्तर देत रोहित म्हणाला, 'बेन्या शब्दाचा अर्थ... खरंतर, माझे अनेक शब्द हे मीच सुचवलेले असतात. मला जे भारी वाटतात ते मी बोलत असतो. बेन्या तर सहज आमच्या सातारा, सांगली आणि कोल्हापुर या बाजुला बोलतात. ते प्रेमानं असतं की ए बेन आहेस का रे? हसतय काय बेन्या? अशा बऱ्याच गोष्टी प्रेमानं बोलतात. त्याचा असा काही वेगळा अर्थ नाही आहे. जसा अनेक शब्दांचा असतो हे म्हणजे हे आणि ते म्हणजे ते, असं काहीच नाही. असे खूप म्हणजेच हजारो शब्द आहेत जे मी हास्यजत्रेत वापरण्याचा प्रयत्न करत असतो. कारण लोकांना ते शब्द फार आवडतात. माझ्या भूमिकेच्या बाबतीत लोकांना तेच आवडतं. त्यानं मज्जा येते.'
हेही वाचा : 'तेव्हा मी रांगेत...', लालबागकर नम्रता संभेरावनं सांगितला 'लालबागच्या राजा'चा मजेदार किस्सा!
रोहित त्याच्या या शब्दांविषयी बोलत असताना नम्रता संभेराव त्याची सहकलाकार लगेच बोलते की 'लगा. लगा पण भारी आहे.' पुढे रोहित बोलतो की 'लगा पण तसाच शब्द आहे. आमच्या घाटावर असं बोलतात की काय लगा. असं असत व्हय लगा, असं काय करते लगा, त्याची एक गंमत आहे.'
रोहितला हास्यजत्रेमुळे लोकप्रियता मिळाली आहे. त्यात आता रोहित मोठ्या पडद्यावर देखील दिसणार आहे. त्याच्या या चित्रपटाचं नाव 'एकदा येऊन तर बघा' असं आहे. या चित्रपटातून प्रसाद खांडेकर दिग्दर्शनात पदार्पण करत आहे. तर त्याच्यासोबत या चित्रपटात गिरीश कुलकर्णी, सयाजी शिंदे, भाऊ कदम, तेजस्विनी पंडित, पॅडी कांबळे, ओंकार भोजने, प्रसाद खांडेकर, विशाखा सुभेदार, राजेंद्र शिसातकर, नम्रता संभेराव, वनिता खरात, शशिकांत केरकर, सुशील इनामदार आदि चित्रपटसृष्टीतील कसलेल्या कलाकारांची भली मोठी फौज प्रेक्षकांना खदखदून हसवणार आहे.