मुंबई : महाराष्ट्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्व पुरूषोत्तम लक्ष्मण देशपांडे. पु. ल. देशपांडे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व. लेखक, गीतकार, संगीतकार, गायक, दिग्दर्शक, अभिनेते या वेगवेगळ्या भूमिका पु. ल. यांनी साकारल्या आहेत. पु.ल. ना चाहते लाडाने 'भाई' असं म्हणतं. आता पु.ल.ची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर येणार आहे. निर्माता - दिग्दर्शक - महेश मांजरेकर हा सिनेमा घेऊन येत आहेत. पु. ल. यांच्यावर 'भाई' हा ही बायोपिक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. महेश मांजेरकर 'भाई - व्यक्ती की वल्ली' या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत.
या सिनेमाच पोस्टर लाँच झालं आहे. या पोस्टरमध्ये भाई म्हणजे पु. ल. पाठमोरे दिसत आहे. मात्र अजून या सिनेमांत भाईंची भूमिका कोण साकारणार? हे अद्याप कळलेलं नाही. तर सुनीताबाई म्हणजे सुनीता देशपांडे पु.ल.च्या पत्नी यांची भूमिका कोण साकारणार? हे देखील अद्याप कळलेलं नाही.
‘फाळकेज् फॅक्टरी’ या नावाने चित्रपट निर्मितीची नवी कंपनी महेश मांजरेकर यांनी सुरू केली आहे. या बॅनरअंतर्गत हा पहिला चित्रपट प्रदर्शित होणार आहे. ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाच्या माध्यमातून ते पुलंचा जीवनपट उलगडून दाखवणार आहेत. यावर्षी पुलंच्या जयंतीदिनी म्हणजेच ८ नोव्हेंबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.