नानांची नाना रुपं; 'ओले आले' मध्ये रंगून गेले नाना पाटेकर

'वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,' हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. 

Updated: Dec 29, 2023, 02:06 PM IST
नानांची नाना रुपं; 'ओले आले' मध्ये रंगून गेले नाना पाटेकर title=

मुंबई : 'वेश असावा बावळा, परि अंतरी नाना कळा,' हे वचन तंतोतंत लागू पडतं ते म्हणजे विविधरंगी कलागुणसंपन्न नाना पाटेकर या कलंदर व्यक्त्मित्त्वाला! कलासक्त नानांनी आजवर असंख्य नाटकं आणि चित्रपटांमधून आपल्यातलं वेगळंपण कायम सिद्ध केलं आहे. पण.. एखादे नाठाळ... खोडसाळ... प्रेमळ बाबा बहुधा प्रथमच आपण नानांच्या स्वरूपात पाहतोय. 'ओले आले' या चित्रपटातून नानांचे आणखी काही कलारंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नववर्षाच्या सुरुवातीलाच म्हणजेच ५ जानेवारीला प्रदर्शित होणाऱ्या 'ओले आले' हा चित्रपट नाना पाटेकरांच्या फॅन्ससाठी एक सरप्राईज पॅकेज असणार आहे हे नक्की. 

मुलाच्या मागे-मागे फिरणारे.. खोड्या काढणारे.. जीवापाड प्रेम करणारे.. आयुष्य खऱ्या अर्थाने जगायला शिकवणारे नाना सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालताहेत. शिस्तप्रिय बाबांच्या व्यक्तिरेखेच्या अगदी उलट अशी ही नानांची भूमिका आपल्याला पोट धरून हसायला लावतेय. आजवर नानांच्या विविध भूमिका आपण पाहिल्या आहेत. त्यांची प्रत्येक भूमिका आपल्याला काही ना काही तरी देऊनच जाते. अशीच 'ओले आले' चित्रपटातली नानांची भूमिका ''जगणं समृद्ध करायला शिकवणारी आहे'' असं ते सांगतात. 

चला जगूया, हसूया, फिरूया म्हणणारे नाना पाटेकर कोकोनट मोशन पिक्चर्स प्रस्तुत 'ओले आले' या चित्रपटाद्वारे येत्या ५ जानेवारीपासून जवळच्या चित्रपटगृहात आपल्याला भेटणार आहेत. या चित्रपटात नाना पाटेकरांसोबतच मकरंद अनासपुरे, सिद्धार्थ चांदेकर, सायली संजीव यांच्या ही महत्त्वपूर्ण भूमिका पाहायला मिळणार आहेत.

आजवर मराठीत नेहमीच हटके आणि नवनवीन विषयांना हात घालणारे चित्रपट बनत आले आहेत. यासाठी मराठी चित्रपटसृष्टी प्रसिद्ध आहे. कोकोनट मोशन पिक्चर्स मराठी रसिक प्रेक्षकांसाठी एक हृदयस्पर्शी कलाकृती घेऊन येत आहेत. काही दिवसांपुर्वी 'ओले आले' या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. यात नाना पाटेकर, सिद्धार्थ चांदेकर आणि सायली संजीव झळकत आहेत  या चित्रपटात मकरंद अनासपुरे हे देखील महत्त्वाची भूमिका साकारणार आहेत. रश्मिन मजीठिया निर्मित, या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक विपुल मेहता यांनी केलं आहे. या टीझरला अवघ्या काही वेळातचं १० लाखांहून व्हूज आले होते. आता या सिनेमाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.