'मुंबईकरांचं अस्तित्वच संपतंय, भूमिपुत्रांच्या...', अंकुश चौधरीची फेसबूक पोस्ट चर्चेत

Ankush Choudhary Emotional Post : 'तोडी मिल फँटसी' या नाटकाच्या माध्यमातून (Todi Mill Fantasy) अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी अंकुशने पोटतिडकीने पोस्ट लिहिलीये.

सौरभ तळेकर | Updated: Jun 18, 2024, 11:29 PM IST
'मुंबईकरांचं अस्तित्वच संपतंय, भूमिपुत्रांच्या...', अंकुश चौधरीची फेसबूक पोस्ट चर्चेत title=

Ankush Chaudhari Post : मराठी रंगभूमीपासून ते रुपेरी पडद्यापर्यंत सर्वच ठिकाणी आपल्या अभिनयाची छाप सोडणारा कलाकार म्हणजे अंकुश चौधरी. अंकुशने (Ankush Choudhary) आपल्या अभिनयाच्या जोरावर मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये वेगळीच छाप उमटवलीये. नाटक, चित्रपट, मालिका अशा तिन्ही माध्यमांतून त्याने आपली कला लोकांपर्यंत सादर केली अन् प्रेक्षकांनी देखील अंकुशला भरभरून प्रेम दिलंय. महाराष्ट्र शाहीर, दुनियादारी, दगळी चाळ, क्लासमेट, ती सध्या काय करते, गुरु, ट्रिपल सीट अशा सिनेमांमधून अंकूशने अभिनयाचा ठसा उमटवलाय. आता अंकुश चौधरीचं नवं नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतंय. अशातच अंकुश चौधरीची पोस्ट (Ankush Choudhary Emotional Post) सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे.

अंकुश चौधरीची पोस्ट काय?

नमस्कार, मी अंकुश चौधरी. गेली पन्नास वर्ष मी या मुंबई शहरात राहतोय. या शहराचा वेग आणि त्याच वेगाने बदलणारं हे शहर मी रोज पाहतोय. याच शहरातल्या गिरणगावात मी लहानाचा मोठा झालो. कॉलेज, नाटक, कट्टा, उत्सव, मॅटर, कॉटर, दोस्ती, यारी, थोडक्यात सांगायचं तर याच गिरणगावात माझी सगळी दुनियादारी.

सांगायची गोष्ट ही की हे शहर बदलतंय आणि यावेळेस फक्त शहर नाही तर सर्वांना सामावून घेण्याची या शहराची मूळ वृत्तीच बदलत आहे. कधी काळी या शहरावर राज्य करणाऱ्या मूळ मुंबईकरांचं अस्तित्वच संपत चाललेलं आहे. ज्यांनी आपल्या रक्ताच पाणी करून हे शहर उभ केलं, त्या कामगारांचं अस्तित्वच हे शहर नाकारू लागलंय, असं अंकुशने पोस्टमध्ये लिहिलंय.

या साऱ्याची जाणीव आणि जाणिवेतून येणारी अस्वस्थता माझ्यासारख्या अनेक भूमिपुत्रांच्या वाट्याला येत असेलच. एक कलाकार म्हणून ही अस्वस्थता लोकांपर्यत पोहचावी म्हणून या शहराची, शहरातील गिरणगावाची आणि या गिरणगावातल्या भूमिपुत्रांची गोष्ट सांगणार 'तोडी मिल फॅन्टसी’ हे नाटक आपल्यासाठी घेऊन येत आहे. २२ जून रोजी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह. सायंकाळी ४:०० वा. राणीबाग भायखळा येथे. या आपल्या शहराची, आपल्या गिरणगावाची गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे. माझी खात्री आहे माझ्या या प्रयत्नात तुम्ही मला नक्की साथ द्याल, अशी पोस्ट अंकुश चौधरीने केली आहे.

दरम्यान, 'तोडी मिल फँटसी' या नाटकाच्या माध्यमातून अंकुश प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. त्यासाठी अंकुशने पोटतिडकीने पोस्ट लिहिलीये. त्यामुळे आता अंकुशच्या या पोस्टची चर्चा होताना दिसतेय.