भरत जाधव यांचं 'अस्तित्व' नाटक पाहिल्यावर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले 'मन आणि मेंदू...'

किरण माने यांनी भरत जाधव यांचे हे नाटक पाहिलं. त्यानिमित्ताने त्यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

Updated: Feb 18, 2024, 02:25 PM IST
भरत जाधव यांचं 'अस्तित्व' नाटक पाहिल्यावर किरण मानेंची पोस्ट, म्हणाले 'मन आणि मेंदू...'

Kiran Mane Bharat Jadhav Astitva Drama : मराठी सिनेसृष्टीतील हरहुन्नरी अभिनेते म्हणून भरत जाधव यांना ओळखले जाते. भरत जाधव यांनी बऱ्याच काळानंतर रंगभूमीवर पदार्पण केले. 'अस्तित्व' या नाटकात ते झळकत आहेत. अपेक्षांच्या गर्दीत हरवलेल्या नात्यांचं 'अस्तित्व' शोधणारे हे एक कौटुंबिक नाटक आहे. सध्या हे नाटक नाट्यरसिकांसाठी चांगलेच पसंतीस पडत आहे. नुकतंच अभिनेते किरण माने यांनी हे नाटक पाहिलं. त्यानिमित्ताने किरण माने यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. 

किरण माने हे सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतात. किरण माने यांनी नुकतंच फेसबुकवर पोस्ट शेअर केली आहे. यात त्यांनी एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत किरण माने आणि भरत जाधव दिसत आहेत. या फोटोला कॅप्शन देताना किरण माने यांनी भरत जाधव यांचे कौतुक केले आहे. त्याबरोबरच त्यांनी 'अस्तित्व' हे नाटक कसं वाटलं याबद्दलही भाष्य केले आहे. 

किरण मानेंकडून भरत जाधव यांचे कौतुक

भरत जाधवचं अभिनेता म्हणून कौतुक करण्याआधी 'निर्माता' म्हणून त्याची पाठ थोपटावी वाटली. 'धंदा' या गोष्टीचा विचार न करता त्यानं एक आशयघन, गंभीर आणि अस्सल मराठी नाटक रंगभूमीवर आणलं... 'अस्तित्व' ! व्यावसायिक नाटक म्हटलं की एक चकचकीत शहरी उच्चवर्गीय जोडपं आणि त्यांच्यातले पुचाट भाबडे समज-गैरसमज, गोड गुळमट गाणी, अधूनमधुन 'पेरलेले' टाळीबाज सुविचार आणि शेवटी सगळे गैरसमज दूर होऊन पडदा पाडणं... नाटक संपल्यावर डायबेटिस होतोय का काय अशी भिती वाटते. हल्ली नाटकांची उथळ नांवं आणि चकचकीत रंगीबेरंगी पोस्टर्स बघुनच शिसारीच येते.

अशा भयाण परिस्थितीत एक असं नाटक आणणं, ज्यात नाटकभर चाळीतली रंग उडालेली खोली दिसते... नाटकाचा हिरो बीएमसी मधला सफाई कामगार आहे, ज्याच्या आयुष्यातले रंगही असेच उडून गेलेत... नाटकभर त्याची आणि त्याच्या कुटूंबाची वेदना आणि दु:ख... हे सगळं एका कोपर्‍यात बसून पहाणारे तथागत बुद्ध आणि डाॅ.आंबेडकर ! सगळंच 'व्यावसायिकते'च्या सगळ्या गणितांना छेद देणारं.

'अस्तित्व'चा अफलातून, जबराट लेखक, दिग्दर्शक स्वप्निल जाधव...आणि सगळे कलाकार याविषयी सविस्तर लिहीन नंतर... पण आधी असा विषय रंगभूमीवर आणायचं धाडस दाखवल्याबद्दल निर्माता म्हणून भरतचं मनापासून अभिनंदन करावंसं वाटतं. पैसा कमावण्यासाठी सुमार नाटकं आणि त्यांचे ढीगभर प्रयोग 'छापणार्‍यांची' सद्दी असण्याच्या काळात निर्माता भरतनं वेगळा मार्ग निवडणं, हे खुप प्रेरणा देणारं आहे. जयंत पवार, विजय तेंडूलकर अशा नाटककारांच्या जवळपास जाणारी संहिता आजच्या भाकडकाळात येणं आश्वासकही आहे. लै दिवसांनी व्यावसायिक नाटक बघुन मन आणि मेंदू तृप्त झाले... लब्यू भरत, अशी पोस्ट किरण माने यांनी केली आहे.  

दरम्यान स्वप्नील जाधव लिखित, दिग्दर्शित ‘अस्तित्व’ या नाटकात चिन्मयी सुमित, सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव, श्याम घोरपडे, जयराज नायर आणि भरत जाधव प्रमुख भूमिकेत आहेत. या नाटकात एका अशा कुटुंबाची कथा दाखवली जाणार आहे, जे आपले अस्तित्व टिकवण्यासाठी धडपडत आहे. या कुटुंबात एकमेव कमावणाऱ्या आणि नोकरीतून लवकरच निवृत्त होणाऱ्या संतोष हसोळकरची कथा दाखवण्यात आली आहे. ज्याने निवृत्तीनंतर मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला आहे, मात्र त्याच्या या निर्णयाला घरच्यांचा विरोध असून प्रत्येक जण आपल्या अस्तित्वाच्या शोधात आहेत. त्यामुळे आता त्यांची ही धडपड यशस्वी होणार का? याचे उत्तर आपल्याला येत्या काळात मिळणार आहे. या नाटकाच्या निमित्ताने सलोनी सुर्वे, हार्दिक जाधव हे नवोदित कलाकार व्यावसायिक रंगभूमीवर पदार्पण करत आहेत. साई पियुष यांचे या नाटकाला संगीत लाभले असून सरीता भरत जाधव या नाटकाच्या निर्माती आहेत.

By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.

x