मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा कायमच काही ना काही तरी कारणांनी चर्चेत असतो. विनोदाचं अचूक टायमिंग, स्वभावातील साधेपणाने आणि उत्तम अभिनयाच्या जोरावर त्याने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे. ‘दे धक्का’, ‘जत्रा’, ‘क्षणभर विश्रांती’, ‘बकुळा नामदेव घोटाळे’, ‘इरादा पक्का’ अशा अनेक चित्रपटांमुळे सिद्धार्थ घराघरांत लोकप्रिय झाला. त्याने मराठीसह बॉलीवूड चित्रपटसृष्टीत स्वत:ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. सध्या सिद्धार्थ लग्नकल्लोळ या चित्रपटामुळे चर्चेत आहे.
सिद्धार्थ जाधवचा 'लग्नकल्लोळ' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळताना दिसत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने सिद्धार्थच्या चाहत्यांनी त्याच्या 25 फुटांच्या कटआऊटला दुधाचा अभिषेक केला. याबद्दल सिद्धार्थने पोस्ट शेअर केली आहे. यावेळी सिद्धार्थने त्याला काय वाटतं, याबद्दल त्याच्या भावनाही व्यक्त केल्या आहेत.
"जाम भारी feeling!!! लग्न कल्लोळ च्या निमित्ताने जे प्रेम मिळतंय त्यावर खरच विश्वास बसत नाहीये.. आज कोपरगाव मध्ये लग्न कल्लोळचा premier होता.. आणि थिएटर च्या बाहेर माझा २५ फुटाचा भला मोठा cutout उभारला गेला..त्यावर दुधाचा अभिषेक करण्यात आला..(ते दूध प्रतिकात्मक होतं.. दूध वाया जाऊ नये म्हणुन ते दूध ५०० विद्यार्थ्यांना वाटण्यात आलं...) माझ्या २४ वर्षाच्या या छोट्याश्या कारकीर्दीत हे पहिल्यांदाच घडतंय... बापरे काय कमाल वाटत होतं.. खरंच मयूर सर आणि संपुर्ण टीम चे मनापासून आभार.. मराठी कलाकार म्हणून मायबाप रसिकांचा जो आशिर्वाद मिळतोय तो खरच स्वप्नवत आहे.. आणि लग्न कल्लोळ ला मिळणारा प्रतिसाद खुप भारी आहे... हा अभिषेक म्हणजे तुमच्यातल्याच एका सर्वसामान्यावर तुम्हीच तुमच्या प्रेमाचा केलेला वर्षाव आहे. Lv u all..असाच प्रेम असुदे!!!", असे सिद्धार्थ जाधवने म्हटले आहे.
दरम्यान लग्नकल्लोळ या चित्रपटात सिद्धार्थ जाधवसोबतच भूषण प्रधान, मयुरी जाधव हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटाची निर्मिती आण्णासाहेब रामचंद्र तिरमखे, मंगल आण्णासाहेब तिरमखे, डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी केली आहे. ‘लग्न कल्लोळ’ चित्रपटाची कथा जितेंद्रकुमार परमार यांनी लिहिली आहे. तर मोहम्मद एस. बर्मावाला व डॉ. मयुर आण्णासाहेब तिरमखे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.