Suruchi Adarkar Exit From Serial : 'झी मराठी' वाहिनीवरील 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' ही मालिका सध्या टीआरपीच्या यादीत पहिल्या क्रमांकावर पाहायला मिळत आहे. या मालिकेला सुरुवात झाल्यापासून यात विविध ट्वीस्ट पाहायला मिळाले. त्यामुळे ही मालिका लोकप्रिय झाली. सध्या या मालिकेत अस्तिकाचा अंत होणार असल्याचे दाखवले जात आहे. या मालिकेत अस्तिका हे पात्र अभिनेत्री सुरुची अडारकरने साकारले आहे. त्यामुळे आता या मालिकेतून सुरुची अडारकर एक्झिट घेणार आहे. तिने स्वत: याबद्दल एक पोस्ट शेअर केली आहे.
मराठमोळी सुरुची अडारकर ही सोशल मीडियावर सक्रीय आहे. आता तिने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये सुरुचीने अस्तिकाच्या भूमिकेतील काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंना कॅप्शन देताना तिने प्रेक्षकांचे आभार व्यक्त केले आहेत. यावेळी ती भावूक झाल्याचे पाहायला मिळाली.
"काही गोष्टींचा कालावधी हा कमी असतो, पण तो अल्पजीवी नक्कीच नसतो. माझे अस्तिका हे पात्र प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. झी मराठी आणि आयरिश प्रोडक्शनने मला इतके काल्पनिक पात्र दिल्याबद्दल धन्यवाद. मी हे पात्र साकारु शकेन, असे मला वाटलं नव्हतं. 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेच्या टीमसोबत काम करणं ही एक फारच उत्तम ट्रीट होती. मालिकेतील सर्व आठवणींसाठी नेहमीच कृतज्ञ राहीन.
ऐश्वर्या नारकर ताई, तितिक्षा तावडे, एकता डांगर, अमृता रावराणे यांचा विशेष उल्लेख करावासा वाटतोय, कारण त्यांनी मला प्रेमळ निरोप दिला. मला या मालिकेमुळे आयुष्यभरासाठी नक्कीच चांगले मित्र मिळाले आहेत. माझी या मालिकेतील भूमिका अल्प काळासाठी होती, पण याने माझ्या हृदयाचा मोठा भाग व्यापला आहे. मायबाप प्रेक्षक, तुमचे विशेष आभार इतके भरून प्रेम दिल्याबद्दल. मी कायम तुमची ऋणी राहीन. असेच कायम माझ्यावर प्रेम करत राहा आणि आशीर्वाद द्या", असे सुरुची अडारकरने म्हटले.
दरम्यान सुरुची अडारकरने 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत अस्तिका हे विरोचकाचे पात्र साकारले होते. यानिमित्ताने तब्बल 8 वर्षांनी तिने ‘झी मराठी’ वाहिनीवर पुनरागमन केले. या मालिकेत तिचा ग्लॅमरस लूक पाहायला मिळाला होता. तिच्या भूमिकेला प्रेक्षकांचाही चांगला प्रतिसाद मिळाला होता.