भाजपाध्यक्ष जे पी नड्डा (BJP President JP Nadda) यांच्यापासून ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपर्यंत (PM Narendra Modi) अनेकांनी मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) भाजपा संघटनेचं नेहमी कौतुक केलं आहे. दरम्यान तंत्रज्ञानाच्या या युगात संघटनेला अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने भाजपाने आपला पहिला व्हॉट्सअप (WhatsApp) प्रमुख बनवण्याचं काम सुरु केलं आहे. मध्य प्रदेशात भाजपाने आपल्या पहिला व्हॉट्सअप प्रमुखाची देखील नियुक्ती केली आहे.
भोपाळचे राहणारे रामकुमार चौरसिया खासगी नोकरी करतात. त्यांची व्हॉट्सअप ग्रुप प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. रामकुमार चौरसिया यांनी 'आज तक'शी संवाद साधताना सांगितलं की, "त्यांनी एमएससी पर्यंत अभ्यास केला आहे. ते मूळचे रायसेन जिल्ह्याचे निवासी आहेत. पण गेल्या 30 वर्षांपासून ते भोपाळमध्ये राहत आहेत".
भाजपामध्ये त्यांचा बूथ क्रमांक 223 आहे. रामकुमार यांच्या म्हणण्यानुसार, ते पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून फार प्रभावित आहेत आणि यामुळेच ते भाजपाच्या बाजूने आहेत. ज्याप्रकारे नरेंद्र मोदींनी पंतप्रधान झाल्यानंतर देशातील तरुणांमध्ये उत्साह निर्माण झाला आहे, तसंच आज जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे ते पाहून आपल्याला फार गर्व वाटतो आणि त्यामुळेच आपण भाजपासोबत काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
रामकुमार म्हणाले की, भाजपाने मला राज्याचा पहिला व्हॉट्सअप ग्रुप प्रमुख बनवलं आहे. पक्षाची विचारधारा आणि सरकारी योजनांची माहिती बूथवरील सर्व मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असेल.