जीव नकोसा होतो.... ; विशाखा सुभेदारच्या चेहऱ्याचा रंग का उडाला ? 'ती' पोस्ट चर्चेत

चांगल्या कलाकृतीची अपेक्षा ठेवण्याचा हक्क प्रेक्षक म्हणून आपल्याला आहे ?   

Updated: May 19, 2022, 03:26 PM IST
जीव नकोसा होतो.... ; विशाखा सुभेदारच्या चेहऱ्याचा रंग का उडाला ? 'ती' पोस्ट चर्चेत  title=
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : काही कलाकारांची नावं घेतली, की नकळतच चेहऱ्यावर हसू येतं. अशा कलाकारांमध्ये येणारं एक नाव म्हणजे अभिनेत्री विशाखा सुभेदार. चित्रपट असो किंवा मग एखादा कार्यक्रम, विशाखाची विनोदी फटकेबाजी कायमच प्रेक्षकांची मनं जिंकते. इतकंच नव्हे, तर धीरगंभीर भूमिकांनाही ती तितक्याच ताकदीनं न्याय देते. 

एक कलाकार जेव्हा मोठा होत असतो तेव्हा त्याच्या पाठीशी अनेक गोष्टींचं बळ असतं. विशाखाच्या पाठीही असंच बळ आहे. पण, काही बाबतीत मात्र आता तिला मनस्तापाचाच सामना करावा लागत आहे. (Vishakha subhedar)

जीव नकोसा झाला आहे... असं म्हणत विशाखानं नुकतीच सोशल मीडियावर लक्ष वेधणारी पोस्ट केली. आजवर अनुभवलेल्या काही आव्हानांना तिनं वाचा फोडली. विशाखानं केलेली ही पोस्ट वाचल्यानंतर एक प्रेक्षक म्हणून तुम्हीही विचारात पडाल. (vishakha subhedar facebook)

कारण, ज्या कलाकारांकडून तुम्ही दर्जेदार कामाची अपेक्षा करता त्याच कलाकांना इतकं काही पाहावं लागत असेल, तर आपण एक प्रेक्षक म्हणूनही कुठेतरी अपयशी ठरलो आहोत हेच स्पष्ट होत आहे. 

विशाखानं पोस्टमध्ये काय म्हटलं आहे ? 

" कुर्रर्रर्रर्र " या नाटकाच्या प्रयोगानंतर ज्या प्रसंगांचा समना केला त्याला तिनं शब्दांत मांडलं. बालगंधर्व आणि अण्णाभाऊ साठे नाट्यगृहांमध्ये सादरीकरणानंतर तिला प्रचंड मनस्ताप झाला. कुठे शौचालयं स्वच्छ नव्हती, तर कुठे ग्रीन रुममध्ये बसण्यासाठी सोयही नव्हती. 

बरं एकाच ठिकाणी नव्हे, तर दुसरीकडेही तिची हीच अवस्था. लाईटच नाही, एसी चालतच नाही, ग्रीन रुममध्ये पाहवतही नाही असंच चित्र डोळ्यासमोर. त्यातच नाटक सादर करणं म्हणजे परीक्षाच. अशा या परिस्थितीमध्ये कुणाचाही संताप अनावर होणं स्वाभाविक आहे. विशाखासोबतही तेच झालं. सहनशीलतेचा अंत झाला आणि अखेर तिनं सर्वांनाच खडबडून जाग आणली. 

किमान आतातरी, नाट्यगृह व्यवस्थापकांनी सारवासारव करण्यापेक्षा सुधारणांवर भर द्यावा, हीच एक अपेक्षा खुद्द विशाखा आणि इतर सर्वांनीच व्यक्त केली आहे.