close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

...म्हणून होणाऱ्या पतीची खिल्ली उडवणाऱ्यांना नेहा पेंडसेने फटकारलं

त्यांना नेहाने थेट शब्दांमध्ये सुनावलं आहे. 

Updated: Sep 15, 2019, 12:17 PM IST
...म्हणून होणाऱ्या पतीची खिल्ली उडवणाऱ्यांना नेहा पेंडसेने फटकारलं
छाया सौजन्य- सोशल मीडिया

मुंबई : जवळपास महिनाभरापूर्वी टेलिव्हिजन विश्वात आपली अशी वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री नेहा पेंडसे हिने तिच्या खासगी आयुष्याविषयी एक महत्त्वाची बाब सर्वांसमोर आणली होती. व्यावसायिक शार्दुल सिंह बयास याच्यासोबतच्या नात्याचा तिने जाहीरपणे स्वीकार केला. इटलीतील एका प्रेक्षणीय स्थळी गेले असतानाचा फोटो पोस्ट करत तिने ही आनंदाची बातमी दिली. ज्यामागोमाग आता नेहाच्या लग्नसोहळ्याच्या कार्यक्रमांची लगबग सुरु झाल्याची माहिती समोर येत आहे. 

'बॉम्बे टाईम्स'ला दिलेल्या मुलाखतीत तिने याविषयीची माहिती दिली. सोबतच शार्दुल आणि तिच्या नात्याची खिल्ली उडवणाऱ्यांवरही तिने या मुलाखतीदरम्यान तोफ डागली. 

२०२० च्या सुरुवातीलाच मराठमोळ्या पद्धतीने विवाहसोहळा पार पडणार असल्याची माहिती तिने दिली. पण, या सोहळ्याचं स्वरुप नेमकं कसं असेल याविषयी मात्र तिने उलगडा केला नाही. यावेळी सोशल मीडियावर आपल्या नात्याविषयी, मुख्य म्हणजे शार्दुलविषयी येणाऱ्या प्रतिक्रियांना तिने धुडकावून लावलं. 

स्थुलतेमुळे शार्दुलची खिल्ली उडवणाऱ्यांविषयी ती म्हणाली, ''फक्त शार्दुलच का?, मे आय कम इन मॅडम या कार्यक्रमाच्या वेळी माझीसुद्धा खिल्ली उडवण्यात आली होती. एक प्रेक्षक म्हणून तुम्ही अभिनेत्यांच्या दिसण्यावर प्रतिक्रिया देऊच शकता. पण, त्यांच्यावर निशाणा साधू नका.''

ठराविक क्षणाला अमुक एक व्यक्ती एखाद्या आजाराचा किंवा शारीरिक, मानसिक किंवा भावनिक अडचणींचा सामनाही करत असेल, ही बाब लक्षात घेतली गेली पाहिजे हा मुद्दाही तिने सर्वांसमोर ठेवला. 'शार्दुलचा मनोरंजन विश्वाशी फारसा संबंध नाही. तो एक व्यावसायिक आहे त्यामुळे त्याची खिल्ली उडवली जाणं हे संतापजनक आहे. हाच मिळाला का?, आणखी कोणी नाही मिळालं का? अशा प्रतिक्रिया खपवून घेतल्या जाणार नाहीत', या शब्दांत तिने नाराजी व्यक्त केली. 

समोरची व्यक्ती मला किती आनंदात ठेवते याची तुम्हाला कल्पना तरी आहे का, असं खडसावत तिने आपल्या साथीदाराविषयी प्रश्न उपस्थित करणारे तुम्ही कोण असा थेट प्रश्न खिल्ली उडवणाऱ्यांना विचारला. शार्दुलच्या रुपात आपल्याला आयुष्यभराचा प्रेमाचा साथीदार लाभल्याचं म्हणत आपण खिल्ली उडवणाऱ्यांना जुमानत नसल्याचंच नेहा म्हणाली.