मुंबई : बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता मिथुन चक्रवर्तीचा मुलगा मिमोह चक्रवर्ती लवकरच विवाहबद्ध होणार आहे. मिमोहच्या लग्नाची खबर येताच त्याची होणारी बायको चर्चेत आहे. तिची चर्चा होण्याची दोन कारणे आहेत. एक म्हणजे ती मिथुन चक्रवर्तीची सून होणार आहे आणि दुसरे म्हणजे ती खूप सुंदर आहे. पण मिमोहची होणारी पत्नी मदालसा शर्मा नक्की आहे तरी कोण?
ती एक अभिनेत्री असून तिचा सिनेसृष्टीशी चांगलाच परिचय आहे. मदालसाने हिंदी, तेलगू, कन्नड, तमिळ, जर्मन आणि पंजाबी सिनेमात काम केले आहे. मदालसाला लहानपणापासूनच अभिनेत्री व्हायचे होते. तिचे आई-वडीलही सिनेसृष्टीशी संबंधित आहेत. मदालसाचे वडील सुभाष शर्मा एक प्रसिद्ध दिग्दर्शक आहेत तर आई शीला शर्मा अभिनेत्री आहे. त्यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले होते. मदालसाची आई शीला शर्मा यांनी 'नदिया के पार', 'यस बॉस', 'घातक', 'हम साथ-साथ हैं' यांसारख्या लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केले आहे. याशिवाय १९९८ मध्ये आलेल्या बी.आर. चोपड़ाची मालिका महाभारतात तिने देवकीची भूमिका साकारली होती. या भूमिकेने त्यांची खास ओळख निर्माण झाली.
मदालसाने तेलगू सिनेमा 'फिटिंग मास्टर' मधून अभिनयास सुरुवात केली. त्यानंतर तिने कन्नड सिनेसृष्टी नशीब आजमावले. त्यानंतर पुन्हा तेलगू सिनेमांत परतली. हिंदी सिनेमा एंजेलमध्ये देखील तिने काम केले होते. या सिनेमाची निर्मिती कोरिओग्राफर गणेश आचार्यने केली होती. याशिवाय मदालसाने 'ए गर्ल विद द इंडियन एमेरोल्ड' या जर्मन सिनेमातही काम केले आहे. तर पंजाबी सिनेमा 'पटियाला ड्रीम्ज' मध्येही मदालसा झळकली होती.