नवी दिल्ली : देशभरात लॉकडाऊन असताना मॉडेल पूनम पांडेने लॉकडाऊनचे नियम तोडल्याचं समोर आलं होतं. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने पूनम पांडेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र तिला अटक केली असल्याची अफवा रविवारपासून पसरत होती. आता पूनम पांडेने (Poonam Pandey) एक व्हिडिओ शेअर करत या याबाबतची माहिती दिली आहे.
पूनम पांडेने लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने तिला अटक झाल्याच्या अफवेनंतर तिने एक व्हिडिओ शेअर केलाय. व्हिडिओमध्ये तिने या सर्व अफवांचं खंडण केलं आहे. काल रात्रीपासून मला अटक झाली आहे, अशाप्रकारचे फोन मला येत आहेत. पण मी घरी आहे आणि सुरक्षित असल्याचं सांगत तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.
लॉकडाऊनमध्ये संपूर्ण बॉलिवूड सेलिब्रिटी घरांमध्ये आहेत. सर्व सेलिब्रिटींकडून लॉकडाऊनच्या नियमांचं पालन करण्याचं सांगण्यात येतंय. कोणतंही कारण नसताना पूनम पांडे आपली कार घेऊन मरीन ड्राइव्ह परिसरात लॉकडाऊनच्या काळात फिरत होती. लॉकडाऊनच्या नियमांच उल्लंघन केल्याप्रकरणी मॉडेल पूनम पांडेसह तिच्या एका साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पूनम पांडेवर गुन्हा दाखल, लॉकडाऊनमध्ये तोडला हा नियम
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मरीन ड्राइव्ह पोलीस स्थानकात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तिची बीएमडब्ल्यू कारही ताब्यात घेतली असल्याचं बोलल जात आहे.
वरिष्ठ निरीक्षक पोलीस मृत्यूंजय हिरेमठ यांनी पीटीआयला दिलेल्या माहितीनुसार, आपत्ती कायद्यांतर्गत आयपीसी कलम 188, 269 आणि 51 (बी) अंतर्गत पूनम पांडे आणि तिच्या साथीदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.