मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस मनी लाँड्रिंग प्रकरणी चौथ्या समन्सनंतर ईडी कार्यालयात पोहोचली आहे. ईडीने जॅकलीनला सुकेश चंदाशेखर 200 कोटींच्या जामीन प्रकरणात समन्स बजावले होते. ईडीने जॅकलिनला तिचं बँक स्टेटमेंट आणि तीन वर्षांचे डेबिट/क्रेडिट कार्ड स्टेटमेंट सोबत आणण्यास सांगितलं होतं. यापूर्वी ईडीची टीम 4 वेळा जॅकलिनची चौकशी करण्याचा प्रयत्न करत होती. मात्र जॅकलीन ईडीच्या चौकशीत सामील होऊ शकली नाही.
जॅकलीन फर्नांडिस 25 सप्टेंबर, 15 ऑक्टोबर, 16 ऑक्टोबर आणि 18 ऑक्टोबर रोजी ईडीसमोर उपस्थित राहू शकली नाही. याआधी, ईडीने 30 ऑगस्ट रोजी या प्रकरणात जॅकलिनचे बयान नोंदवलं होतं. सुकेश चंद्रशेखर यांच्याविरोधात नोंदवण्यात आलेल्या फसवणुकीच्या प्रकरणात मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याअंतर्गत जॅकलीन फर्नांडिसचं बयान नोंदवलं जात आहे. जॅकलीन या प्रकरणात साक्षीदार आहे. सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन यांच्यात काही आर्थिक व्यवहार झाला की नाही याची तपासणी एजन्सी करत आहे.
दिल्लीच्या रोहिणी कारागृहात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखरवर एका व्यापाऱ्याकडून एका वर्षात 200 कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. त्यांच्यावर खंडणीचे 20 हून अधिक गुन्हे दाखल आहेत आणि त्यांनी कारागृहाच्या आतून रॅकेट चालवलं आहे. मूळची श्रीलंकेची जॅकलिन बॉलिवूड अभिनेता सलमान खानची जवळची व्यक्ती मानली जाते. जॅकलिनचे वडील श्रीलंकेचे रहिवासी आहेत. तर आई मलेशियाची आहे. जॅकलिनचे वडील संगीतकार आहेत आणि आई एअर होस्टेस होती. जॅकलीन 4 भावंडांमध्ये सगळ्यात लहान आहे. जॅकलिनला एक मोठी बहीण आणि 2 मोठे भाऊ आहेत.