रणवीर नव्हे, हा तर 'जयेशभाई जोरदार'...

'`८३' या चित्रपटानंतर.... 

Updated: Dec 4, 2019, 12:07 PM IST
रणवीर नव्हे, हा तर 'जयेशभाई जोरदार'...
जयेशभाई जोरदार

मुंबई : कायमच काही हटके भूमिका साकारत प्रेक्षकांना थक्क करणारा अभिनेता रणवीर आता आणखी एका दमदार भूमिकेतून झळकणार आहे. एकिकडे खेळाडू म्हणून क्रिकेटच्या मैदानावर एका चित्रपटासाठी घाम गाळणारा रणवीर, दुसरीकडे 'जयेशभाई जोरदार'चं पात्रही साकारत आहे. 

यंदाच्या वर्षी सुरुवातीलाच त्याने या चित्रपटाविषयीची माहिती दिली होती. दिव्यांग ठक्कर दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती मनिष शर्मा करत आहेत. तर, आदित्य चोप्रा यांच्या बँनरअंतर्गत हा चित्रपट साकारला जात आहे. सध्याच्या घडीला प्रदर्शनासाठी सज्ज असणाऱ्या, क्रिकेट विश्वचषक विजयावर आधारित '`८३' या चित्रपटानंतर रणवीरचा 'जयेशभाई जोरदार' प्रदर्शित होणार आहे. 

नुकताच त्याच्या या चित्रपटाचा फर्स्ट लूक प्रदर्शित करण्यात आला आहे. ज्यामध्ये रणवीर भगव्या रंगाच्या एका प्रिंटेड शर्टमध्ये दिसत आहे, तर, त्याचा मागे डोक्यावरुन पदर घेतलेल्या काही महिला दिसत आहेत. रणवीरच्या चेहऱ्यावरील हावभाव आणि त्याचा एकंदर लूक पाहता या चित्रपटाच्या कथानकाविषयी कुतूहल व्यक्त केलं जात आहे. 

जयेशभाई हे एक असं पात्र आहे, जे सर्वसामान्य असूनही तितकंच उठावदार आहे. अडचणीच्या प्रसंगातही तो काहीतरी भन्नाट करुन जातो, अशा शब्दांत महिला आणि पुरुषांना समान हक्क असावेत या विचारधारेवर चालणाऱ्या जयेशभाई या पात्राविषयी रणवीरने माहिती दिल्याचं वृत्त 'डीएनएने' प्रसिद्ध केलं आहे.