मुंबई : रजनीकांत... म्हणजे एकेकाळचे शिवाजी गायकवाड. फक्त नाव घेतलं तरी या अभिनेत्याच्या लोकप्रियतेची प्रचिती य़ेते. सध्या दक्षिणेतील सर्वात मोठा सुपरस्टार, 'थलैवा' अशी त्यांची ओळख. पण, दक्षिणेत राहिले तरी रजनीकांत यांची मराठी नाळ मात्र तुटलेली नाही. त्यांचा 'दरबार' नावाचा आगामी चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्यानिमित्तानेच मुंबईत पार पडलेल्या एका कार्यक्रमात त्यांनी चक्क मराठीतून संवाद साधला आणि अनेकांना आश्चर्यचकीत केलं.
'माझ्या मराठी भाषेची लय ही बेळगावच्या मराठीची आहे', असं म्हणत मराठीतून बोलण्यास रजनीकांत यांनी सुरुवात केली आणि उपस्थितांमध्ये एकच जल्लोष पाहायला मिळाला. अगदी उत्स्फूर्तपणे मराठी भाषेतून वक्तव्य करणाऱ्या सुपरस्टार रजनीकांत यांचा हा अंदाज सर्वांची मनं जिंकून गेला. दाक्षिणात्य भाषेची लय असणारं त्यांचं मराठी ऐकण्याचा आनंद अनेकांनी सोशल मीडियावरही व्यक्त केला.
आगामी चित्रपटाच्या चित्रीकरणाविषयी सांगताना येत्या काळात आपण, 'येत्या काळात मला मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा आहे. शिवाय मुंबईकरांवरही माझं खूप प्रेम आहे.... ' असं रजनीकांत म्हणाले. तेव्हा आता खुद्द थलैवानेच तयारी दाखवल्यामुळे त्यांच्यासाठी योग्य असा चित्रपट करण्यास कोण पुढाकार घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
'आय एम अ बॅड कॉप....', म्हणत रजनीकांत यांची सलमानला टक्कर
दरम्यान, रजनीकांत २०२० या वर्षाच्या सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या भेटीला एका नव्या रुपात येणार आहेत. त्यांचं हे रुप असणार आहे एका अफलातून पोलीस अधिकाऱ्याचं. 'दरबार' या चित्रपटाच्या निमित्ताने ते या भूमिकेतून झळकतील. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलरही प्रदर्शित करण्यात आला, ज्याची सोशल मीडियावरही कमालीची चर्चा झाली.