...म्हणून 'गर्ल्स'विरोधात सलील कुलकर्णींचा निषेध

चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्य़ात 

Updated: Oct 10, 2019, 03:40 PM IST
...म्हणून 'गर्ल्स'विरोधात सलील कुलकर्णींचा निषेध title=

मुंबई : संगीत दिग्दर्शक सलील कुलकर्णी यांनी नुकतंच सोशल मीडियाच्या माध्यमातून एका आगामी मराठी चित्रपटाचा विरोध केला आहे. 'गर्ल्स' असं या चित्रपटाचं नाव आहे. सहसा मराठी चित्रपटांविषयी कलाकार कायमच त्या चित्रपटांच्या पक्षातील काही गोष्टी नमूद करत प्रेक्षकांचं लक्ष वेधत असतात. पण, सलील कुलकर्णी यांनी मात्र या चित्रपटाविरोधात सूर आळवला आहे. 

विशाल सखाराम देवरुखकर यांचं दिग्दर्शन असणाऱ्या या चित्रपटाचे दोन पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. त्यातीलच एका पोस्टरवर मुख्य भूमिकेतील अभिनेत्री आक्षेपार्ह हातवारे करताना दिसत आहे. मुख्य म्हणजे तिच्या टी- शर्टवर 'आयुष्यावर बोलू काही' असंही लिहिण्यात आलं आहे. ज्यावर सलील कुलकर्णी यांनी थेट शब्दांत आपली हरकत दर्शवली आहे. 

फेसबुकच्या माध्यमातून त्यांनी एक पोस्ट लिहित संबंधित चित्रपटावियषयी आपलं मत मांडलं. ''नाती... आई - बाबा... घर... या हळव्या विषयांना हात घालणारा आमचा आणि तुमचा लाडका कार्यक्रम मराठी कविता आणि गाण्यांचा. 'आयुष्यावर बोलू काही'..... मी आताच एक पोस्टर पाहिला. या अभिजात चित्रपटातील ही सुसंस्कृत व्यक्ती familysucks आणि 'आयुष्यावर बोलू काही' असं लिहिलेला टी- शर्ट घालून असभ्य हालचाली करते...'', असं लिहित आपल्या कार्यक्रमाबद्दल हा आदर आहे का? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. 

जवळपास १६ वर्षांपासून प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडणाऱ्या कार्यक्रमाचा हा असा अपमान नेमका का?,  त्यामागे नेमका काय विचार असेल? असे प्रश्न सलील कुलकर्णी यांनी उपस्थित करत आपण या साऱ्याचा निषेध करत असल्याचं स्पष्ट केलं. अनेकांनी कुलकर्णी यांच्या पोस्टवर कमेंट करत त्यांचीही मतं मांडली. तेव्हा आता चित्रपटाच्या सुरुवातीपासून होणारा विरोध पाहता त्यावर पुढे कोणती पावलं उचलली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.