'नाळ 2'चा ट्रेलर पाहिलात का? तुमचेही डोळे पाणावतील

२०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड 'चैतू'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले.

Updated: Nov 3, 2023, 05:18 PM IST
'नाळ 2'चा ट्रेलर पाहिलात का? तुमचेही डोळे पाणावतील title=

मुंबई : २०१८मध्ये प्रदर्शित झालेल्या सुधाकर रेड्डी यंकट्टी दिग्दर्शित 'नाळ' या चित्रपटाने अभूतपूर्व यश प्राप्त केले. राष्ट्रीय पुरस्कारावर नाव कोरले. त्या इवल्याशा गोड 'चैतू'ने प्रेक्षकांच्या मनात घर केले. मात्र ही कथा एका अशा वळणावर येऊन थांबली, जिथे अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. तेव्हा न उलगडलेल्या या प्रश्नांची उत्तरे आता 'नाळ भाग २'मध्ये मिळणार आहेत. झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे निर्मित 'नाळ भाग २' दिवाळीत म्हणजेच १० नोव्हेंबर रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होत असून नुकतेच या चित्रपटाचे ट्रेलर सोशल मीडियावर झळकले आहे. या चित्रपटात श्रीनिवास पोकळे, नागराज मंजुळे, देविका दफ्तरदार, दिप्ती देवी, त्रिशा ठोसर आणि जितेंद्र जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

'नाळ'मध्ये खऱ्या आईकडे निघालेला चैतू, त्याच्या खऱ्या आईकडे पोहोचणार का? त्यांच्यातील अबोला दूर होणार का, याचे उत्तर आपल्याला 'नाळ भाग २'मध्ये मिळणार आहे. 'नाळ भाग २'चे ट्रेलरही उत्कंठा वाढवणारे आहे. ट्रेलर पाहाता हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यात यशस्वी होणार असल्याचे दिसतेय. नागराज मंजुळे यांच्या चित्रपटात चित्रीकरण स्थळही एक व्यक्तिरेखा साकारत असते. याचा प्रत्यय 'नाळ भाग २'मध्येही येत आहे. ज्याप्रमाणे कलाकार इतक्या ताकदीचे दिसत आहेत, तितकेच चित्रीकरण स्थळही महत्वाची भूमिका बजावत आहे. नदी, दऱ्या, डोंगर, घरे असे निसर्गसौंदर्य चित्रपटात अतिशय सुरेखरित्या टिपण्यात आल्याचे दिसत आहे. ट्रेलरमध्ये विशेष लक्ष वेधत आहे ते चिमुकल्या गोंडस चिमीकडे. तिची निरागसता प्रेक्षकांना मोहणारी आहे. ज्याप्रमाणे 'नाळ'हा भावनिक, कौटुंबिक चित्रपट होता, तसाच 'नाळ भाग २'ही आहे. 

चित्रपटाबद्दल दिग्दर्शक सुधाकर रेड्डी यंकट्टी म्हणतात, '''नाळ ची कथा जिथे थांबते तिथून पुढे 'नाळ भाग २'ची कथा सुरु होते. नात्यांना जोडणारी, घट्ट बांधणारी  ही कथा आहे. आम्हाला खात्री आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा तुमच्यासोबत आमची नाळ जोडली जाणारा आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना कल्पना आली असेलच. त्यामुळे मी मनापासून प्रेक्षकांना सांगतो, हा 'नाळ भाग २' चित्रपटगृहात आवर्जून पाहा.'' 

बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, '' छोट्याशा गावातील छोटीशी ही कथा आहे. जी मनाला स्पर्शून जाणारी आहे. गावाकडची ओढ लावणारा, आपल्याला  गावाच्या प्रेमात पाडणारा हा चित्रपट आहे. माणसाची नाळ कशी जोडली जाते, याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा चित्रपट. सगळेच कलाकार सर्वोत्कृष्ट आहेत. मात्र बालकलाकारांबद्दल मी आवर्जून सांगेन, यापूर्वी तुम्ही श्रीनिवासला पाहिले आहे. 'नाळ'मधील एवढासा चैतू आता मोठा झाला आहे. त्याचाही परिपक्व अभिनय दिसेल. मात्र यातील चिमी ही सगळ्यात लहान आहे आणि तिने उत्तम अभिनय केला आहे. एकंदरच हा चित्रपट म्हणजे मनोरंजनाचे दिवाळी गिफ्ट हॅम्पर आहे.''