Video: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर...

Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: विराटचा ज्या ऑस्ट्रेलियन खेळाडूबरोबर वाद झाला तो पहिलाच अंतरराष्ट्रीय कसोटी सामना खेळत होता.

स्वप्निल घंगाळे | Updated: Dec 26, 2024, 11:52 AM IST
Video: मेलबर्न कसोटीमध्ये मैदानात राडा! 19 वर्षीय खेळाडू विराटला धडकल्यानंतर... title=
विराट कोहली अन् नवख्या खेळाडूमध्ये वाद

Video Virat Kohli Vs Sam Konstas Fight On Ground: भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यान बॉर्डर गावसकर चषक स्पर्धेच्या चौथ्या सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाकडून सॅम कोस्टासने कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केलं आहे. सॅम हा चौथा सर्वात कमी वयात पदार्पण करणार ऑस्ट्रेलियन खेळाडू ठरला आहे. आज पहिल्यांदा अंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात पाऊल ठेवणार सॅम हा केवळ 19 वर्ष 85 दिवसांचा आहे. मात्र या तरुण खेळाडूने काही काळ भारतीयांच्या छातीत धडकी भरवली होती. मात्र अन्य एका करणामुळे हा तरु खेळाडू आज चर्चेत राहिला तो म्हणजे विराट कोहलीबरोबर मैदानात झालेली त्याची बाचाबाची!

बुमराहच्या गोलंदाजीवरही फटकेबाजी

अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करताना सॅमची पहिलीच खेळी छाप सोडून जाणारी ठरली. त्याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या यजमान संघाला उत्तम सुरुवात करुन दिली. या 19 वर्षीय क्रिकेटपटूने सुरुवातीपासूनच आक्रमक खेळी करत भारतीय गोलंदाजांना धक्का दिला. दमदार अर्धशतक झळकावताना सॅमने जसप्रीत बुमराहसारख्या जागतिक दर्जाच्या खेळाडूच्या गोलंदाजीचाही समाचार घेतल्याचं दिसून आलं. 

विराट अन् सॅममध्ये घडलं काय?

मात्र सामन्यातील 10 व्या ओव्हरनंतर विराट कोहली स्लीपमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी पीचच्या दुसऱ्या बाजूला जात असताना सॅम आणि त्याची धडक झाली. विराटने समोरुन येणाऱ्या सॅमच्या उजव्या खांद्याला आपल्या उजव्या खांद्याने धक्का दिला. आधी 36 वर्षीय विराटने मागे वळूनही पाहिलं नाही. मात्र आपल्याला विराटने धक्का दिल्याचं सॅमला आवडलं नाही. तो विराटला काहीतरी बोलला. मात्र हे ऐकून विराटने करड्या नजरेनं मागे पाहिलं. त्यानंतर या दोघांमध्ये बाचाबाची झाली. मात्र उस्मान ख्वाजा आणि पंच डेव्हीड गुह या दोघांनी दोन्ही क्रिकेटपटूंना वाद वाढवू देण्यापासून रोखलं.

वादाचा परिणाम नाही

या वादाचा सॅमच्या फलंदाजीवर काहीच परिणाम झाला नाही. त्याने 52 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावलं. त्याने अर्थशतक झळकावल्यानंतर आपल्या जर्सीवरील क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या लोगोकडे बोट दाखवत बॅट उंचावून ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांना अभिवादन केलं. त्यानंतर लगेचच सॅमने मोहम्मद सिराजला पूल शॉट लगावत चौकार मारला. 

कितीवर बाद झाला?

सॅमला संघात स्थान द्यावं असं माजी कर्णधार रिकी पॉइण्टींग आणि शेन वॉट्सनसारख्या माजी क्रिकेटपटूंचं फार अधिकापासूनच म्हणणं होतं. अखेर आज त्याला मेलबर्न कसोटीमध्ये स्थान मिळालं. सॅम या पहिल्याच सामन्यात 65 बॉलमध्ये 60 धावा करुन बाद झाला. त्याने 6 चौकार आणि 2 षटकार लगावले.