Navra Maza Navsacha Movie:मराठी चित्रपटसृष्टीतील ब्लॉकब्लास्टर चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा'. या चित्रपटातील गाणी, डायलॉग आणि कलाकारांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहेत. अलीकडेच नवरा माझा नवसाचा सिक्वेल प्रदर्शित झाला आहे. मात्र, एकीकडे हा चित्रपट रिलीज होऊन काहीच आठवडे झाले असतील तर नवरा माझा नवसाचा चित्रपटाली एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओतून चित्रपटातील एक चूक प्रेक्षकांच्या नजरेस पडली आहे.
2004 साली 'नवरा माझा नवसाचा' हा चित्रपट रिलीज झाला होता. सचिन पिळगावकर, सुप्रिया पिळगावकर आणि अशोक सराफ यांच्या प्रमुख भूमिका आहेत. या चित्रपटात अनेक कलाकारांची फौज आहे. वैभव मांगले, प्रदीप पटवर्धन, जयवंत वाडकर यांच्याही महत्त्वाच्या भूमिका होत्या. त्याचबरोबर, जॉनी लिव्हर आणि अली अजगर पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेत दिसले होते. सोनु निगमने गायलेले 'हिरवा निसर्ग हा' हे गाणं आजही लोकप्रिय आहे. चित्रपटातील गाणी, डायलॉग आजही लोकांच्या तोंडपाठ आहेत. या चित्रपटाला 19 वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, आताच या सिनेमातील एक दृश्य सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आलं आहे. मात्र सुप्रिया पिळगावकर यांनी या व्हिडिओवर कमेंट करत त्याबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे.
सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. 'नवरा माझा नवसाचा' पहिल्या भागातील एक दृष्य व्हायरल झालं आहे. एका इन्स्टाग्राम हँडलवर हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आला आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओत 'चला ना गडे' गाणं सुरू होण्यापूर्वीचा सीन पाहायला मिळतो. यात भक्ती वक्रतुंडला गणपती पुळ्याला निर्वस्त्र येण्यासाठी गळ घालत असते. पण त्याच वेळी या सीनमध्ये भक्ती आणि वक्रतुंडच्या (सचिन-सुप्रिया) पाठीमागून एक व्यक्ती डोकावताना दिसत आहे. या व्यक्तीच्या हातात लाइट किंवा साउंड बार असल्याचे दिसतंय. हा व्यक्ती लाइटमन असावा किंवा काळ्या रंगाची फ्रेम घेऊन उभा असेल असा अंदाज नेटकरी लावत आहेत. तसंच, काही जण ही चूक असल्याचेही म्हणत आहे. मात्र, सुप्रिया पिळगावकर यांनी या व्हिडिओवर कमेंट करत त्या सीनवर स्पष्टीकरण दिलं आहे.
व्हायरल झालेल्या व्हिडिओवर सुप्रिया पिळगावकर यांनी कमेंट केली आहे. त्या म्हणतात की, या चित्रपटाचे त्या काळात चित्रीकरण करण्यात आले होते जेव्हा निगेटिव्हचा वापर केला जायचा. त्या फॉरमेटमध्ये फ्रेमच्या डाव्या बाजूला साउंड गेट होते. ते मोठ्या स्क्रीनवर कधीच दिसले नाहीत. मात्र, आत्ताच्या डिजीटल युगात ते या प्लॅटफॉर्मवर दिसत आहेत, असं सुप्रिया पिळगावकर यांनी म्हटलं आहे.