नवी दिल्ली : संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' सिनेमाला एकीकडे देशभरात विरोध होत आहे. तर, दुसरीकडे पंजाबमधील राजपूत महासभेने आपला विरोध मागे घेतला आहे. इतकचं नाही तर, 'पद्मावत' सिनेमाचं कौतुकही केलं आहे.
इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, सिनेमाला होत असलेला विरोध पाहता अनेक राजपूत समाजासाठी ठिकाणी स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं.
त्यानुसार २४ जानेवारी रोजी पठाणकोटमध्ये राजपूत समाजातील नागरिकांसाठी एक स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं. जिल्हा प्रशासनाने या स्पेशल स्क्रिनिंगचं आयोजन केलं होतं.
२४ जानेवारी रोजी सायंकाळी झालेल्या 'पद्मावत' सिनेमाच्या स्क्रिनिंगनंतर राजपूत महासभेने आपला विरोध मागे घेतला आहे.
रिपोर्टनुसार 'पद्मावत' सिनेमा पाहिल्यानंतर राजपूत महासभाचे अध्यक्ष दविन्दर दर्शी यांनी सांगितलं की, "आम्ही हा सिनेमा पाहिला, या सिनेमात राजपूत समाजासंदर्भात काहीही आक्षेपार्ह किंवा वादग्रस्त सीन्स तसेच संदर्भ नाहीयेत. हा सिनेमा प्रदर्शित करण्यास आमचा कुठल्याही प्रकारचा विरोध नाहीये".
दविन्दर दर्शी यांनी पुढे सांगितलं की, राजपूत समाजातील ३० नेत्यांनी हा सिनेमा पाहिला आणि सिनेमाला आता कुठलाही विरोध नाहीये.
पठाणकोटचे एसएसपी विशाल सोनी यांनी सांगितलं की, 'पद्मावत' हा सिनेमा जिल्ह्यातील चार सिनेमागृहांत प्रदर्शित केला जाईल.
राजस्थानमधील श्री राजपूत करणी सेनेने दिग्दर्शक-निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या 'पद्मावत' या सिनेमाला सुरुवातीपासूनच विरोध केला आहे. राजस्थानमधून सुरु झालेला हा विरोध आता देशभरात पसरला आहे.
मोठ्या विरोधानंतर गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश आणि हरियाणाने या सिनेमावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने हा सिनेमा प्रदर्शित करण्याचे आदेश दिले. त्यानुसार 'पद्मावत' सिनेमा संपूर्ण देशभरात प्रदर्शित होत आहे.