'पद्मावत' वादावर नाना पाटेकरांनी मांंडलं 'हे' परखड मत

सिनेमॅटिक लिबिर्टी आणि ऐतिहासिक घटना यांची सांगड घालत चित्रपट बनवणं आणि तो सुरळीत प्रदर्शित करणं हे आजकालच्या सिनेनिर्मात्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. 

Updated: Jan 25, 2018, 11:04 AM IST
'पद्मावत' वादावर नाना पाटेकरांनी मांंडलं 'हे' परखड मत  title=

मुंबई : सिनेमॅटिक लिबिर्टी आणि ऐतिहासिक घटना यांची सांगड घालत चित्रपट बनवणं आणि तो सुरळीत प्रदर्शित करणं हे आजकालच्या सिनेनिर्मात्यांसाठी मोठं आव्हान ठरत आहे. 

'बाजीराव मस्तानी' पाठोपाठ हा वाद 'पद्मावती'वरून पुन्हा रंगला. अखेर चित्रपटामध्ये आणि त्याच्या नावामध्ये बदल करून आज 'पद्मावत'  भारतामध्ये प्रदर्शित  होत आहे. 

मराठी कलाकार नाना पाटेकर यांनीही याबाबतचे आपले मत नुकतेच एका कार्यक्रमामध्ये मांडले आहे.  

काय म्हणाले नाना पाटेकर ?  

कलाकार म्हणून मला जे वाटतं ते मांडण्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे प्रत्येकाला हवेच. पण ऐतिहासिक कथा चित्रपटामध्ये दाखवताना 'स्वातंत्र्या'च्या नावावर काहीही खपवणं म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य नसल्याचे मत नाना पाटेकरांनी एका कार्यक्रमामध्ये मांडले आहे.  

माझ्या सिनेमामुळे कुणीही दुखावले जाणार नाही हा 'सेन्सॉरबोर्ड' आधी स्वतःला हवा असे परखड मत नाना पाटेकरांनी मांडले आहे. 

सजगतेने करा विषयाची निवड 

'सिनेमा हे माध्यम केवळ मनोरंजनाचे नव्हे तर त्यातून प्रबोधन, परिवर्तन होते त्यामुळे सिनेमासाठी विषयाची निवड करताना अंतर्मुख होऊन सजग राहण्याची गरज आहे.  

सेन्सार बोर्डालाही सुनावले 

सिनेमॅटिक लिबर्टीच्या नावाखाली काहीही दाखवणार असू किंवा घडलेल्या प्रसंगाची मोडतोड करणार असू तर ते त्या समाजाच्या भावना दुखावणारं ठरू शकतं, हा विचार प्राधान्याने करायलाच हवा. 

सेन्सार बोर्ड म्हणून सिनेमाला संमती देणारी माणसं अभ्यासू आणि त्या विषयातील सखोल परिणामांचा विचार करणारीही असणेही आवश्यक आहे. 

लवकरच नाना पाटेकरांचा 'आपला मानूस' हा चित्रपट रसिकांच्या भेटीला येणार आहे. यामध्ये नाना पाटेकर एक मर्डर मिस्ट्रीचं रहस्य उलगडणार्‍या ऑफिसरच्या भूमिकेत दिसणार आहेत.