मुंबई : ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ अशा एकापेक्षा एक एक चित्रपटांमध्ये काम करणाऱ्या अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या दोन वर्षांपासून तो ब्रेन कॅन्सरशी झुंज देत होता. अखेर १० मे रोजी त्याने अमेरिकेत अखेरचा श्वास घेतला. २२ फेब्रुवारी २०१९ रोजी ब्रेन कॅन्सरच्या ऑपरेशनसाठी तो अमेरिकेतील लॉस अँजेलिसला गेला होता. तेव्हापासून तो उपचार घेत होता.
साईप्रसाद गुंडेवारने २०१५ साली फॅशन डिझायनर सपना अमीनशी लग्न केले होते. त्याने असा अचानक जगाचा निरोप घेतल्यामुळे चित्रपटसृष्टीमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट व लघुपटांमध्ये विविध भूमिका साकारल्या होत्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका बजावली होती.
याशिवाय साईने ‘स्प्लिट्सविला पर्व ४’ (Splitsvilla Season 4), स्टार प्लस वाहिनीवरील ‘सर्वाइवर’ (Survivor), तसेच अमेरिकेतील लोकप्रिय S.W.A.T., Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies,’द कार्ड’ (The Card) या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या.