मुंबई : अभिनेता अजय देवगन यांची मुख्य भूमिका असणाऱ्या Tanhaji The Unsung Warrior 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटाच्या वाटेत आणखी एक अडचण उभी राहिली आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी आता महिन्याभराहून कमी कालावधी उरलेला असतानाच अखिल भारतीय क्षत्रीय कोळी राजपूत संघाकडून दिल्लीच्या उच्च न्यायालयात या चित्रपटाविरोधात एक याचिका दाखल करण्यात आली आहे.
'मुंबई मिरर'मध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या वृत्तानुसार चित्रपटात दिग्दर्शकाने वास्तविकतेची मोडतोड करत काही दृश्य साकारली आहेत. ज्यामध्ये चित्रपटाच्या कथेमध्ये तान्हाजी मालुसरे यांच्या खऱ्या वंशावळीविषयी दिलेल्या माहितीविषयी दिग्दर्शकाचा विरोध करण्यात आला आहे.
प्रदर्शित झाल्यानंतर 'पानिपत'मध्ये मोठा बदल
उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या या याचिकेनुसार या चित्रपटात दाखवण्यात आल्यानुसार तान्हाजी मालुसरे हे मराठा समाजातील असल्याचं सांगण्यात आलं आहे. पण, मुळात मात्र ते क्षत्रीय महादेव कोळी समाजातील होते. याच धर्तीवर सेंट्रल बोर्ड ऑफ फिल्म सर्टीफिकेशन अर्थात सेन्सॉरनेही या चित्रपटाला तोपर्यंत प्रमाणित करु नये जोपर्यंत यात योग्य प्रकारची माहिती दाखवण्यात येत नाही, अशी मागणीही केली आहे.
दरम्यान, या याचिकेमध्ये नमूद करण्यात आल्यानुसार कोळी समुदायाकडून आतापर्यंत सेन्सॉर बोर्डाकडे वारंवार याविषयीची मागणी करण्यात येऊनही त्यांच्याकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
....अन् 'तान्हाजी'च्या सेटवर देवदत्तला रडू कोसळलं
ओम राऊत दिग्दर्शित 'तान्हाजी- द अनसंग वॉरियर' या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही अद्वितीय आणि तितक्याच सामर्थ्यवान मावळ्यांपैकी एक असणाऱ्या सुभेदार तान्हाजी मालुसरे यांची पराक्रमगाथा साकारण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि त्याची गाणी प्रेक्षकांच्या भेटीला आली. ज्यानंतर चित्रपटाविषयी नाराजीचा सूर आळवण्याच येण्याचे प्रसंग समोर आले. आता या साऱ्याला पुढे कोणतं वळण मिळणार, की 'पद्मावत' आणि 'पानिपत'प्रमाणे या चित्रपटातही काही बदल केले जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.