मुंबई : गेल्या काही वर्षांमध्ये चित्रपट वर्तुळात बऱ्याच अंशी निर्माते आणि दिग्दर्शकांनी कथानकाच्या बाबतीत स्वातंत्र्य घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. पण, सध्याच्या घडीला मात्र याच स्वातंत्र्यावर बाधा आलेली दिसत आहे. याला निमित्त ठरत आहे ते म्हणजे बहुचर्चित चित्रपट 'आदाई'. दाक्षिणात्य चित्रपट वर्तुळातील हा 'आदाई' गेल्या बऱ्याच दिवसांपासून फक्त प्रेक्षकांचच नव्हे, तर इतर क्षेत्रातील व्यक्तींचंही लक्ष वेधत आहे.
काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा ट्रेलर आणि टीझर प्रदर्शित करण्यात आला होता. यामध्ये अभिनेत्री अमाला पॉल हिच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या एका दृश्यामुळे, म्हणजेच न्यूड सीनमुळे अनेक चर्चांना उधाण आलं. काही स्तरांतून तिचा विरोधही करण्यात आला. याचच एक उदाहरण म्हणजे, सध्या तिच्या चित्रपटाविरोधात उठवण्यात आलेला आवाज.
सूत्रांचा हवाला देत 'टाईम्स नाऊ'ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्या चर्चेत असणाऱ्या या चित्रपटाविरोधात राजकीय नेत्या प्रिया राजेश्वरी यांनी अमालाविरोधात एक तक्रार दाखल केली आहे. चुकीच्या संस्कृतीला राज्यात दुजोरा देत असल्याचं म्हणत तिच्यावर तोफ डागण्यात आली आहे. चित्रपटातील न्यूड दृश्यांवर राजेश्वरी यांचा स्पष्ट आक्षेप असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळेच याप्रकरणी अमालाविरोधात पोलिसांनी कडक कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली.
हाती आलेल्या माहितीनुसार 'त्या' न्यूड दृश्यामुळे सध्याच्या तरुणाईत बलात्काराला दुजोरा देणारी भावना बळावेल आणि त्यांना प्रभावित करेल. परिणामी असंही म्हटलं जात आहे की, चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या निमित्ताने न्यूड दृश्यांचा वापर टाळावा असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. तेव्हा आता निर्माते आणि दिग्दर्शक याविषयी कोणता निर्णय घेणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, आपल्याला होणारा हा विरोध पाहता अमालाने तिची ठाम भूमिका मांडली आहे. 'मी कायमच ज्या भूमिकांची निवड केली, त्यासाठी अनेकांचा रोष ओढावून घेतला. पण, पूर्ण सतर्क राहून आणि भविष्यात त्यावर लोक कसे व्यक्त होतील याची अपेक्षा बाळगतच मी हे निर्णय घेतले आहेत. त्यामुळे हे सारंकाही माझ्या आत्मविश्वासाच्या आड येणार नाही', असं अमाला म्हणाली होती.