मुंबई : अभिनेता राजकुमार राव याच्या ‘न्यूटन’ या सिनेमाची नुकतीच भारताकडून ऑस्करसाठी ऑफिशिअल एन्ट्री झाली. २२ सप्टेंबरला याची घोषणा करण्यात आली.
एकीकडे या बातमीने बॉलिवूडमध्ये आनंद आहे. तर दुसरीकडे अभिनेत्री प्रियंका चोप्रा मात्र या बातमीने निराश झाली आहे. प्रियंका आणि तिची आई मधु चोप्रा यांना वाटलं होतं की, त्यांच्या पुरस्कार विजेत्या ‘व्हेंटिलेटर’ या सिनेमाची ऑक्सरसाठी निवड होईल. पण तसे न झाल्याने प्रियंकाला धक्का बसला आहे.
बॉलिवूड लाईफ डॉट कॉम ने दिलेल्या वृत्तानुसार, व्हेंटिलेटरचे दिग्दर्शक राजेश मापुसकर यांच्याशी याबाबत बाबचीत केल्यावर ते म्हणाले की, ‘२२ सप्टेंबरची आम्ही खूप आतुरतेने वाट पाहत होतो. इतकेच काय तर प्रियंकाच्या आईने मला २२ सप्टेंबरच्या एक दिवसआधी फोनही केला होता आणि त्यांना मी म्हणालो होतो की, तुम्ही चिंता करू नका. सर्वात चांगला सिनेमाच ऑस्करसाठी निवडला जाणार. पण आता ‘न्यूटन’चं नाव फायनल झाल्याने आम्हाला थोडी निराशा झाली’.
राजेश म्हणाले की, ‘मला वाटतं या निर्णयामुळे प्रियंका चांगलीच निराश झाली असेल. कारण या सिनेमाबाबत ती फारच उत्साही होती. ‘व्हेंटिलेटर’ प्रियंकाच्या प्रॉडक्शनखाली तयार झालेली तिची सर्वात आवडती फिल्म आहे. मी सुद्धा ‘न्यूटन’बाबत अनेक चांगल्या गोष्टी ऎकल्या आहेत. मला ‘न्यूटन’ कडून खूप अपेक्षा आहेत. मला विश्वास आहे की, हा सिनेमा परदेशात भारताचं नाव मोठं करणार!’