मुंबई : 'रहना है तेरे दिल मे' या चित्रपटानंतर सिनेजगतामध्ये वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या आर. माधवन यानं खऱ्या अर्थानं प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला. हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये माधववनं विशेष योगदान दिलं.
प्रत्येक कलाकृतीमध्ये जीव ओतून त्यानं भूमिकेला न्याय दिला. आजही त्याच्या लोकप्रियतेत तसुभरही कमतरता झाली नाही. पण, मग अशी काय वेळ आली की त्याला देशच सोडावा लागला?
सूत्रांच्या माहितीनुसार R. Madhvan ने अतिशय महत्त्वाच्या कारणासाठी भारतातून दुसऱ्या देशात जाण्याचा निर्णय घेतला.
मुळात त्यानं आणि त्याच्या कुटुंबानं जो निर्णय घेतला हे पाहता स्वप्नपूर्तीसाठी नेमकं कोणत्या सीमा ओलांडाव्या लागतात याचीच प्रचिती येत आहे.
माधवनचा मुलगा, वेदांत यानं वयाच्या 16 व्या वर्षीच 2026 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धांसाठीची तयारी सुरु केली आहे.
स्विमिंग अर्थात जलकरण या खेळामध्ये वेदांत प्रशिक्षण घेत आहे. यासाठी तो दुबईला गेला आहे. त्याच्या प्रशिक्षण प्रक्रियेमध्ये कोणतीही उणीव राहू नये यासाठी माधवन आणि त्याचं कुटुंबच दुबईला रवाना झालं आहे.
मुंबईत मोठे स्विमिंग पूल आहेत, पण तिथे कोविड नियमांमुळे मात्र ही ठिकाणं बंद ठेवण्यात आली आहेत.
परिणामी मोठ्या स्विमिंग पूलची सुविधा असणाऱ्या दुबईमध्ये आपण मुलासोबतच असल्याची माहिती खुद्द आर. माधवन यानं माध्यमांना दिली.
अभिनयात करिअर नाही...
एका मुलाचं पालकत्त्वं असणाऱ्या आर माधवन यानं त्याच्या स्वप्नपूर्तीमध्ये साथ देण्याची जबाबदारी आपलीच असल्याची बाब स्पष्ट केली.
'तो संपूर्ण जगात अनेक स्पर्धा गाजवतोय... जिंकतोय, मला त्याचा फारच गर्व वाटतोय. मला या गोष्टीची अजिबात खंत नाही की तो अभिनय क्षेत्रात करिअर करत नाही.
त्यानं जी वाट निवडली आहे ती मला, माझ्या करिअरपेक्षाही अधिक महत्त्वाची वाटत आहे', असं माधवन म्हणाला.