रणबीर कपूरच्या 'अॅनिमल' चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. 'अॅनिमल' यावर्षी सुपरहिट झालेल्या अनेक चित्रपटांचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. रिलीज झाल्यानंतर फक्त 4 दिवसातच चित्रपटाने अक्षरक्ष: वादळ निर्माण केलं आहे. 'जवान', 'पठाण' आणि 'गदर 2' या सुपरहिट चित्रपटांना 'अॅनिमल'ने मागे टाकलं आहे. पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई केल्यानंतर चौथ्या दिवशीही 'अॅनिमल'ची दमदार कामगिरी कायम आहे.
'अॅनिमल' रणबीर कपूरच्या करिअरमधील सर्वाधिक ओपनिंग देणारा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्या दिवशी 63.8 कोटींसह खातं उघडलं होतं. यानंतर चित्रपटाची दमदार कमाई सुरु आहे.
'अॅनिमल'ने रिलीज झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मोठी झेप घेत 66.27 कोटींची कमाई केली. तर तिसऱ्या दिवशी कमाईचा आकडा 71.46 कोटी होता. यासह फक्त 3 दिवसांत चित्रपट 200 कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे.
'अॅनिमल'ने सोमवारची परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. विकेंडच्या तुलनेत चित्रपटाची कमाई थोडी घसरली आहे. पण तरीही चित्रपटाने जवान, पठाण आणि गदर 2 ला मागे टाकलं आहे. रिपोर्टनुसार, 'अॅनिमल'ने सोमवारी देशभरात 39.9 कोटींचा व्यवसाय केला. यासह 'अॅनिमल'ने जवान (32.92 कोटी), पठाण (26.5 कोटी) आणि गदर 2 (38.7 कोटी) वर मात केली आहे.
'अॅनिमल'ने प्रदर्शित झाल्यानंतर फक्त 4 दिवसांत 241.43 कोटींचा व्यवसाय केला आहे. हिंदी पट्ट्यात चित्रपटाने एकूण 212.58 कोटींची कमाई केली आहे.
पहिल्या दिवशी 63 कोटींची कमाई करणाऱ्या 'अॅनिमल' चित्रपटाने बॉलिवूडला या वर्षातील दुसऱ्या क्रमांकाची ओपनिंग दिली. या चित्रपटाने रणबीर कपूरच्या नावावर सुपरस्टारचा शिक्का मारला असून, त्याच्या करिअरमधील सर्वात मोठा चित्रपट ठरण्याच्या दिशेने वाटचाल सुरु केली आहे.
शाहरुख खानच्या जवान चित्रपटाच्या नावे पहिल्या शनिवारी सर्वाधिक कमाई करण्याचा रेकॉर्ड आहे. या चित्रपटाने पहिल्या शनिवारी 77 कोटींहून अधिक कमावले होते. यानंतर आता दुसऱ्या क्रमांकावर 'अॅनिमल' चित्रपट आला आहे. चित्रपटाने 53.25 कोटींची कमाई करणाऱ्या 'पठाण'ला मागे टाकलं आहे.
'अॅनिमल' चित्रपटाने फक्त 2 दिवसात 130 कोटींची कमाई केली आहे. याआधी पठाण, जवान, टायगर 3 आणि केजीएफ 2 ने फक्त दोन दिवसांत 100 कोटींची कमाई करण्याचा रेकॉर्ड केला आहे. 2 दिवसांत 100 कोटी कमावणारा 'अॅनिमल' हा पाचवा चित्रपट ठरला आहे. पण दोन दिवसांच्या एकूण आकडेवारीत 'अॅनिमल'ने जवान, पठाण आणि गदर 2 चित्रपटांना पिछाडलं आहे.