'मोम की गुडिया' फेम अभिनेत्याचं निधन; अखेरचे दिवस घालवले गरिबीत

१० दिवसांपूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र, अक्षय कुमार आणि सोनू सूद यांच्या मदतीसाठी विनंती केली.

Updated: Jun 14, 2020, 02:21 PM IST
'मोम की गुडिया' फेम अभिनेत्याचं निधन; अखेरचे दिवस घालवले गरिबीत  title=

मुंबई : बॉलिवूडचे अभिनेते रतन चोप्रा यांचं निधन झालं आहे. ते कर्करोगग्रस्त होते, पंजाबच्या मरेलकोटला या ठिकाणी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. रतन चोप्रा यांची मुलगी अनिताने  आपल्या वडिलांच्या निधनाची माहिती दिली आहे. ते कर्करोग या गंभीर आजाराशी झुंज देत होते. कर्करोगासारख्या गंभीर आजारावर  मात करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नसल्याची माहिती त्यांच्या मुलीने दिली आहे. 

रतन यांच्या कुटूंबाशी संबंधित सूत्रानुसार, १० दिवसांपूर्वी त्यांनी बॉलिवूड अभिनेते धर्मेंद्र, अक्षय कुमार आणि सोनू सूद यांच्या मदतीसाठी विनंती केली. दुर्दैवाने त्यांना कोणाचीच मदत मिळाली नाही. त्यांनी त्यांचे अखेरचे दिवस अत्यंत गरिबीत घालवले. त्यांच्या परिसरातील स्थानिक गुरुद्वार व मंदिरांमधून मिळालेल्या अन्नावर त्यांनी पोटाची भूक भागवली. 

रतन चोप्रांनी १९७२ साली 'मोम की गुडिया' या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. या चित्रपटात त्यांनी अभिनेत्री तनुजासोबत स्क्रिन शेअर केली होती. या चित्रपटानंतर त्यांना 'लोफर', 'आया सावन झूम के' आणि 'जुगनू'  या चित्रपटांमध्ये भूमिका साकारण्यासाठी ऑफर देखील मिळाल्या होत्या. परंतु आजीच्या  सांगण्यावरून  त्यांनी या ऑफर नाकारल्या. त्यानंतर त्यांनी अभिनयाकडे वळून ही पाहिले नाही.