मुंबई : गुरूवारी ३० एप्रिल २०२० रोजी बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते ऋषी कपूर यांनी वयाच्या ६७व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या दोन वर्षांपासून ते ल्यूकेमियाशी (leukemia) झुंज देत होते. ल्यूकेमियाशी या गंभीर आजाराचं निदान लागण्याआधी ते 'शर्माजी नमकीन' या चित्रपटाच्या शुटींगमध्ये व्यस्त होते. पण कर्करोगासारखा गंभीर आजार बळावल्यामुळे त्यांना उपचारासाठी परदेशात जावे लागले. उपचारानंतर भारतात परतल्यानंतर त्यांनी १५ जानेवारी २०२० पासून चित्रपटाच्या शुटींगसाठी नव्याने सुरूवात केली. चित्रपटाच्या प्रॉडक्शनचं काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे ऋषी कपूर यांना अखेरच्या चित्रपटाच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर पाहण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.
पिंकव्हिलाने या वृत्ताला दुजोरा दिला आहे. प्रॉडक्शन हाऊस एक्सेल एंटरटेन्मेंटकडून चित्रपटाची निर्मितीचं काम पूर्ण झाल्याचं सांगण्यात येत आहे. 'एक्सेल एंटरटेन्मेंचा हा चित्रपट अपूर्ण ठेवण्याचा कोणताही हेतू नाही. 'शर्माजी मनकीन' हा ऋषी कपूर यांचा अखेरचा चित्रपट आहे. त्यामुळे हा चित्रपट रूपेरी पडद्यावर आणण्यासाठी आम्ही कोणतीही कसर सोडणार नाही. ' असं चित्रपटाच्या प्रॉडक्शन हाऊस कडून सांगण्यात येत आहे.
दरम्यान भारतात परतल्यानंतर त्यांची बहीण रितू नंदा यांचं निधन झालं. तेव्हा देखील परिस्थिती हाताळत त्यांनी चित्रपटाचं शुटींग बंद केलं नाही. कारण चित्रपटात मुख्य भुमिका असल्यामुळे चित्रपटाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्या खांद्यावर होती. ऋषी कपूर त्यांच्या कामात अत्यंत चोख होते आणि ही शिकवण त्यांना त्यांचे वडील राज कपूर यांच्याकडून मिळाली होती.
बहिणीच्या निधनानंतर त्यांनी चित्रपटाच्या शुटींगची वेळ आणि ठिकाण मागितलं आणि पुन्हा कामाला सुरूवात केली. 'शर्माजी नमकीन' या चित्रपटात ते अभिनेत्री जूही चावलासोबत स्क्रिन शेअर करताना चाहत्यांना अनुभवता येणार आहे.