लव सोनियाने मला सजग नागरिक बनवले – सई ताम्हणकर

सई साकारतेय देह विक्री करणारी स्त्री 

लव सोनियाने मला सजग नागरिक बनवले – सई ताम्हणकर title=

मुंबई : तबरेज नुरानी दिग्दर्शित आंतरराष्ट्रीय चित्रपट ‘लव सोनिया’मध्ये सई ताम्हणकर दिसणार आहे. 14 सप्टेंबरला रिलीज होणा-या ह्या सिनेमामध्ये वेश्याव्यवसायातल्या अंजली ह्या भूमिकेत दिसणा-या सई ताम्हणकरला देहविक्रयाच्या व्यवसायाविषयी चित्रीकरणाआधी अभ्यास करावा लागला.

लव सोनिया करताना केलेल्या निरीक्षणाविषयी सई ताम्हणकर सांगते, “आपण कळत्या वयापासून ह्या व्यवसायाविषयी कितीही ऐकलं असलं तरी,  माझ्यासारखी मध्यमवर्गीय सुखवस्तू घरात लहानाची मोठी झालेली व्यक्ती जेव्हा वेश्यावस्तीत पहिल्यांदा पाऊल ठेवते. तेव्हा पहिल्याच दिवशी मनाला लागणारा चटका शब्दात न सांगण्याजोगा आहे. दहा बाय दहाच्या छोट्या खोलीत पाच-पाच माणसं कशी राहतात, कशा अवस्थेत आणि वातावरणात देहविक्रयाचा व्यापार होतो. हे जेव्हा तुम्ही पाहता, तेव्हा आपल्या मध्यमवर्गीय आयुष्यातली दु:खच तुम्ही विसरून जाता.”

सई पूढे सांगते, “चोरलेल्या मुलांना इथे एका छोट्या पिंज-यात ठेवलं जातं. त्यांच्याकडून मजूरी केली जाते. भीक मागितली जाते, जबरदस्तीने त्यांना देहविक्रीच्या धंद्यात ढकलंल जातं. अशावेळी त्यांच्या मनावर काय परिणाम होत असतात, त्याची कल्पनाही सामान्यांना नसते.”

सई आपल्या अनुभवांबाबत सांगते, “असे अनेक धक्कादायक अनुभव मला आले. आणि त्यामूळे आता माझी गाडी कोणत्याही सिग्नलला थांबली की, समोरून भीक मागायला आलेल्या किंवा काही वस्तू विकायला आलेल्या मुलांची मी पहिल्यांदा चौकशी करते. त्यांनी दिवसभरात काही खाल्लं आहे का? ते शाळेत जातात का? ह्याविषयी कुतूहलाने विचारते. मला अधिक सजग बनवण्याचं काम लव सोनिया सिनेमाने केले.”