मुंबई : चाहते त्यांच्या लाडक्या कलाकारांसाठी नेहमीच काही ना काही करत असतात. मात्र तुम्ही कधी असं ऐकलंय का कि, चाहत्याने आपल्या लाडक्या कलाकाराला आपली सगळी प्रॉपर्टीच देवून टाकली आहे. होय असं एका चाहत्याने आपल्या आवडत्या कलाकारासाठी हे केलंय. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटलं असेलं पण हे खरं आहे.
असाच काहीसा प्रकार बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता संजय दत्तसोबत काही वर्षांपुर्वी घडला आहे. संजयच्या एका महिला चाहत्याने त्याच्यासाठी हे केलं आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबईची रहिवासी असलेल्या निशी हरिश्चंद्र त्रिपाठीने मृत्यूपूर्वी तिची सर्व संपत्ती संजय दत्तच्या नावावर ट्रान्सफर केली होती. यामध्ये 10 कोटी रुपयांच्या घराचाही समावेश आहे. असं सांगितलं जातं की, निशी तिच्या आई आणि कुटुंबासह मुंबईत राहत होती. संजय दत्तला जेव्हा ही गोष्ट समजली तेव्हा तोही थक्क झाला. ही संपूर्ण घटना 2018 मधील असल्याचं सांगण्यात येत आहे.
संजय दत्तला या घटनेची कोणतीही माहिती नव्हती, त्यानंतर पोलिसांनी त्याला संपूर्ण प्रकार सांगितलं. त्यावेळी बाबा कोलकाता येथे एका चित्रपट महोत्सवात सहभागी होण्यासाठी गेला होता. त्यानंतर पोलिसांनी त्याला फोनवर या सगळ्या प्रकरणाची माहिती दिली. पोलिसांनी बाबाला सांगितलं की, निशी नावाच्या 62 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ती तुझी खूप मोठी चाहती होती. यामुळे तिने आपली सगळी मालमत्ता तुझ्या नावावर केली आहे. हे ऐकून संजयलाही खूप आश्चर्य वाटलं. अभिनेत्याची या महिलेसोबत काहीच ओळख नव्हती किंवा तो तिला कधीही भेटलेला नाही. यावर अभिनेता म्हणाला, 'मला धक्का बसला आहे, माझ्याकडे बोलायला शब्द नाहीत.'
निशीच्या घरच्यांनाही आश्चर्य वाटलं
निशीच्या घरच्यांनाही या निर्णयाने आश्चर्य वाटलं होतं. मीडिया रिपोर्ट्सनुसार, निशीच्या मृत्यूनंतर तिचं एक पत्र समोर आलं. यामध्ये तिने मृत्यूनंतर आपली सर्व मालमत्ता संजय दत्तला हस्तांतरित करण्याची इच्छा व्यक्त केली होती. तिने नॉमिनी म्हणून संजयचं नाव आणि पत्ता दिला होता.
त्यानंतर संजय दत्तने एक मोठा निर्णय घेतला
ही घटना समोर आल्यानंतर संजय दत्तला धक्का बसला आणि तो भावूकही झाला. मग तो म्हणाला की, मी निशीला ओळखत नाही. पण या गोष्टीने मला खूप भावूक केलं आहे. मी तिच्या मालमत्तेवर कोणताही दावा करत नाही. तिच्या कुटुंबियांना हे सगळं मिळालं पाहिजे. संजय दत्तच्या वकिलाने सांगितलं होतं की, अभिनेत्याने चाहत्याच्या कुटुंबाला मदत करण्याची ऑफर दिली आहे. इच्छापत्र त्यांच्या कुटुंबाला हस्तांतरित करण्याच्या संपूर्ण प्रक्रियेत ते मदत करतील. याबाबत त्यांनी बँकेला पत्रही लिहिलं आहे. निशीच्या कुटुंबीयांना त्याची मालमत्ता मिळावी, असं तो म्हणाला होता.