इंशाअल्लाह चित्रपट रद्द झाल्यानंतर आलिया भट्ट फार रडली होती. ती प्रचंड संतापली होती आणि तिने स्वत:ला एका खोलीत बंद करुन घेतलं होतं असा खुलासा बॉलिवूड दिग्दर्शक संजय लिला भन्साळी (Sanjay Leela Bhansali ) यांनी केला आहे. The Hollywood Reporter India ला दिलेल्या मुलाखतीत संजय लिला भन्साळी यांनी जेव्हा आलिया या चित्रपटाच्या जागी गंगुबाई काठियावाडी चित्रपटात गंगुबाईची भूमिका ऑफर केली तेव्हा नेमकी काय प्रतिक्रिया होती याबद्दलही सांगितलं.
भन्साळी म्हणाले, “मी तिच्यासोबत इंशाअल्लाह चित्रपट करत होतो. पण काही कारणास्तव अचानक चित्रपट बंद पडला. यानंतर ती तुटली, रडली, रागावली आणि स्वतःला एका खोलीत कोंडून घेतलं. मग मी तिला एका आठवड्यानंतर फोन केला आणि म्हणालो की तू गंगूबाईची भूमिका करत आहेस. ती म्हणाली, 'लॉस एंजेलिसमधून, जिथे मला हे पात्र साकारायचे होते (इंशाअल्लाह) तिथून मी कामाठीपुराला आले आहे. मी ते कसे करू? मला हे पात्र माहित नाही. मी म्हणालो, 'तुझा माझ्यावर विश्वास आहे का, आणि तू मला ओळखतेस का?' मग मी तुझ्यातील त्या कणखर स्त्रीला स्पर्श करेन कारण मी ते तुझ्या डोळ्यांत पाहू शकतो. तू करत असलेल्या काही गोष्टींवर किती ठाम आहेस हे मी पाहू शकतो, मला तुझे व्यक्तिमत्त्व समजलं आहे''.
पुढे त्यांनी सांगितलं की, "जेव्हा एखादी अभिनेत्री मी देहविक्री करणाऱ्या महिलेची भूमिका कशी निभावू, माझा आवाज खालच्या पातळीचा आहे, मी तिथे कसं उभं राहणार वैगैर प्रश्न विचारतं तेव्हा नेमक्या कोणत्या गोष्टीवर क्लिक करायचं हे मला माहिती असतं. आलिया गंगुबाईच्या भूमिकेत अत्यंत सहजपणे शिरली होती. आजही अनेकदा ती गंगुबाईप्रमाणे बोलते, इतका ती चित्रपटाचा भाग झाली होती. मी तिच्यावर विश्वास ठेवला हे फार सुंद होतं".
गंगुबाई काठियावाडी (2002) हा भन्साळी दिग्दर्शित एक क्राइम ड्रामा चित्रपट आहे, ज्यामध्ये आलिया मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट एस हुसैन झैदी यांच्या 'माफिया क्वीन्स ऑफ मुंबई' या पुस्तकावर आधारित आहे आणि मुंबईच्या कामाठीपुरा येथील वेश्यालयात विकलेल्या गंगूच्या प्रवासावर आधारित आहे. यात शंतनू माहेश्वरी, विजय राज, इंदिरा तिवारी, सीमा पाहवा, जिम सरभ आणि अजय देवगण यांच्याही भूमिका आहेत.
अभिनेत्री-दिग्दर्शकाची ही जोडी आता लव्ह अँड वॉरमध्ये एकत्र काम करणार असून यात रणबीर कपूर आणि विकी कौशल यांच्याही भूमिका आहेत. हा चित्रपट आता 20 मार्च 2026 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. येत्या काही महिन्यांत लव्ह आणि वॉरची शुटिंग सुरु होण्याची अपेक्षा आहे.