मुंबई : धोनीच्या फॅन्ससाठीी खुशखबर आहे. २०१६ साली आलेला 'एम.एस.धोनी : अनटोल्ड स्टोरी' या चित्रपटाचा सिक्वल येणार आहे. या सिक्वलमध्ये पुन्हा सुशांतसिंग राजपूतच धोनीची भूमिका साकारणार आहे. या सिक्वलमध्ये धोनीची वर्ल्ड कप जिंकल्यानंतरची कहाणी सांगण्यात येणार आहे. भारतानं २०११ साली धोनीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप जिंकला होता. या सिक्वलमध्ये धोनीच्या आयुष्यातले वेगवेगळे पैलू उलगडणार आहेत. चित्रपटात धोनीची पत्नी साक्षी आणि मुलगी जिवाबद्दलच्या गोष्टीही असतील.
मिड डेनं दिलेल्या वृत्तानुसार धोनीच्या आयपीएलमधल्या प्रवासावरही या चित्रपटात भाष्यं करण्यात येईल, अशी माहिती सुशांतच्या एका जवळच्या सूत्रानं दिली आहे. या चित्रपटात धोनीच्या नेतृत्वात चेन्नईचा विजय दाखवण्यात येईल. तसंच २०१५ सालच्या वर्ल्ड कपमध्ये भारताचा सेमी फायनलपर्यंतचा प्रवासही असेल.
धोनीच्या या सिक्वलचा दिग्दर्शक कोण असेल हे अजून ठरलेलं नाही. पण मुख्य अभिनेता मात्र सुशांतसिंग राजपूतच असेल. पुढच्या वर्षी या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होईल. आरएसव्हीपी फिल्मचे रॉनी स्क्रूवाला या चित्रपटाची निर्मिती करतील.
२०१६ साली आलेला 'एम.एस.धोनीः अनटोल्ड स्टोरी' हा चित्रपट धोनीच्या सुरुवातीच्या आयुष्यातल्या संघर्षावर होता. या चित्रपटात सुशांतसिंग राजपूत सोबतच दिशा पटानी, कियारा अडवाणी आणि अनुपम खेरही होते. नीरज पांडे यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं. या चित्रपटानं २१६ कोटी रुपयांची कमाई केली होती.