'शहीद भाई कोतवाल'चा प्रेरणादायी ट्रेलर

२४ जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित 

Updated: Jan 10, 2020, 03:11 PM IST
'शहीद भाई कोतवाल'चा प्रेरणादायी ट्रेलर title=

मुंबई : 'एकतर स्वातंत्र्य, नाहीतर स्वर्ग' असं म्हणत ब्रिटिशांविरोधात निधड्या छातीनं लढणाऱ्या "शहीद भाई कोतवाल" यांच्यावर आधारित चित्रपट २४ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा प्रेरणादायी ट्रेलर सोशल मीडियाद्वारे लाँच करण्यात आला. 

स्वरजाई आर्ट मीडिया प्रॉडक्शनच्या प्रवीण दत्तात्रेय पाटील यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे तर  सिद्धेश एकनाथ देसले, सागर श्याम हिंदुराव चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. एकनाथ देसले आणि पराग सावंत यांनी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून कथा पटकथा संवाद आणि गीते एकनाथ देसले यांनी लिहिली आहेत.भाई कोतवाल यांच्यासह गोमाजी पाटील आणि हिराजी पाटील या बाप लेकांच्या शौर्याची कथा ही यात पहायला मिळणार आहे 

या चित्रपटात आशुतोष पत्की, ऋतुजा बागवे, निशिगंधा वाड, माधवी जुवेकर,अरुण नलावडे, गणेश यादव, पंकज विष्णू, कमलेश सावंत, मिलिंद दस्ताने, सिद्धेश्वर झाडबुके, श्रीरंग देशमुख, अभय राणे, परेश हिंदुराव, प्राजक्ता दिघे आदींच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. तुषार विभुते यांनी कॅमेरामन म्हणून काम पाहिले असून संकलक पराग सावंत आहेत.  अशोक पत्की, रुपेश गोंधळी, भरत बडेकर यांनी संगीत दिलेल्या गाण्यांना सुरेश वाडकर, स्वप्नील बांदोडकर, आदर्श शिंदे, ज्ञानेश्वर मेश्राम, ऐश्वर्या देसले यांच्या सुमधुर आवाजात ही गाणी रेकॉर्ड काण्यात आली आहेत. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे असून कला दिग्दर्शक म्हणून देवदास भंडारे यांनी काम पाहिले आहे.

आजपर्यंत स्वातंत्र्य संग्रामातील अनेक व्यक्तिमत्त्वांवर आधारित चित्रपट आले. पण काहीशा दुर्लक्षित राहिलेल्या भाई कोतवाल यांची शौर्यकथा पहिल्यांदाच चित्रपटातून समोर येत आहे. त्यामुळे या चित्रपटाविषयी आधीपासूनच उत्सुकता आहे, त्यात आता या गोळीबंद ट्रेलरमुळे हा चित्रपट लक्षवेधी ठरला आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून येत्या २४ जानेवारीला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.