Pathaan Box Office Collection Day 3: चार वर्षांनी मोठ्या पडद्यावर परतलेल्या शाहरुख खानला (Shahrukh Khan) 'पठाण' (Pathaan) चित्रपटाने संजीवनी दिली आहे. 'पठाण' चित्रपट पाहण्यासाठी शाहरुखचे चाहते चित्रपटगृहांबाहेर गर्दी करत आहेत. चित्रपट प्रदर्शित होऊन तीन दिवस होऊनही मिळणारा प्रतिसाद मात्र कायम आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भारतात पठाण जास्त कमाई करु शकलेला नसला तरी जगभरात मात्र या चित्रपटाचा बोलबाला आहे.
चित्रपट समीक्षक रमेश बाला यांनी ट्वीट करत सांगितलं आहे की, भारतात पठाणने 34 ते 36 कोटींची कमाई केली आहे. सुट्टीचा दिवस नसल्याने ही कमाई फार काही मोठी नाही. पण चित्रपटाने पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी केलेली कमाई पाहता हा आकडा फार कमी आहे. तिसऱ्या दिवसाच्या कमाईत पठाण चित्रपट आमीर खानच्या दंगल, बाहुबली २ आणि केजीएफ२ ला मागे टाकण्यात अपयशी ठरला आहे.
मात्र शाहरुखच्या चाहत्यांनी नाराज होण्याचं कारण नाही. कारण जगभरात पठाण चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद कायम आहे. रमेश बाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, पठाणने फक्त तीन दिवसांत जगभरातील कमाईत 300 कोटींचा टप्पा गाठला आहे. यासह पठाणने आणखी एक रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे. आता वीकेंडला हा चित्रपट किती कमाई करतो हे पाहावं लागणार आहे.
#Pathaan crosses ₹ 300 Crs Gross at the WW Box office in 3 days..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 28, 2023
पठाण चित्रपटाने पहिल्या दिवशी 54 कोटींची कमाई केली. यासह पठाणने बॉक्स ऑफिसवर नवा रेकॉर्ड रचला आहे. आतापर्यंत कोणत्याही चित्रपटाला इतकी मोठी सुरुवात मिळालेली नाही. दरम्यान जगभरातील कमाईचा आकडा 106 कोटी होता. प्रजासत्ताक दिनाच्या सुट्टीचा फायदा घेत पठाणने दुसऱ्या दिवशी 70 कोटी कमावले. यासह जगभरातील कमाईचा आकडा 235 कोटींवर पोहोचला. तीन दिवसात पठाणने 300 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
#Pathaan Day 3 All-India Early estimates is ₹ 34 to 36 Crs Nett..
— Ramesh Bala (@rameshlaus) January 28, 2023
शाहरुख खानच्या पठाणने आतापर्यंत 21 नवे रेकॉर्ड केले आहेत. कोविडनंतर पठाण पहिला चित्रपट आहे, ज्याने सलग दोन दिवस इतकी कमाई केली आहे.