मुंबई : सेलिब्रिटी आपल्या चाहत्यांसोबत कनेक्टेड राहण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणात वापर करताना दिसतात. बऱ्याचदा सेलिब्रिटी येथे आपली मतं मांडताना दिसतात. पण आता एका मराठमोळ्या अभिनेत्याला राजकीय भूमिका घेणं चांगलचं भोवलं आहे.
सोशल मिडीयावर राजकारणाविषयी मत मांडल्यामुळे किरण माने वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. किरण माने ( Kiran Mane ) मुलगी झाली हो या मालिकेत महत्त्वाची भूमिका साकारत होते. या मालिकेमुळे ते घराघरात पोहोचले. निर्मात्यांनी किरण माने यांना 'मुलगी झाली हो' मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवला होता. सध्या या प्रकरणाची चर्चा वाऱ्यासारखी पसरत आहे.
स्टार प्रवाह वाहिनीवर 'मुलगी झाली हो' ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येते. या मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटीलच्या भूमिकेत दिसत होते. त्यांनी मुख्य पात्र असणाऱ्या साजिरीच्या वडिलांची भूमिका साकारली होती. परंतु त्यांना तडकाफडकी मालिकेतून काढून टाकल्यानं सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे. आता मालिकेचा नवीन पोस्टर समोर आला आहे. ज्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आलं आहे.
नवीन पोस्टरमध्ये फक्त साजिरी आणि शौनक दिसून येत आहेत. या पोस्टरमधून किरण माने यांना वगळण्यात आल्याचं दिसून येत आहे. जुन्या पोस्टरमध्ये किरण माने यांना महत्वाचं स्थान होतं.
हे नवं पोस्टर सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चेत आहे. हा फोटो व्हायरल होत आहे.
महत्त्वाचं म्हणजे किरण माने आता शरद पवार यांना भेटणार अशी चर्चा देखील रंगत आहे. यामुळे हे प्रकरण अधिक तापण्याची चर्चा आहे.