मुंबई : बॉलिवूडमध्ये खलनायकाची भूमिका साकारणारा अभिनेता अमजद खान यांचा आज 77 वा वाढदिवस. शोले या सिनेमात गब्बरची भूमिका साकारून अमजद खान यांनी जगभरात लोकप्रियता मिळवली. त्यानंतर ही भूमिका अजरामर केली. 12 नोव्हेंबर 1940 रोजी पेशावरमध्ये जन्म झालेले अमजद खान हे गब्बरसाठी पहिली पसंती अजिबात नव्हते.
गब्बर या भूमिकेसाठी सर्वात अगोदर डॅनी यांना हा रोल ऑफर करण्यात आला होता. डॅनी यांनी अफगाणिस्तानमध्ये फिरोज खान यांच्या धर्मात्मा या सिनेमाची शुटिंग करण्यास सुरूवात केली आली आणि शोले हा सिनेमा सोडला. यानंतर गब्बरचा रोल अमजद खान यांना मिळाला. सलीम खान यांनी जावेद अख्तर यांना अमजद खान यांच नाव सुचवलं होतं. जावेद अख्तर यांनी अमजद खान यांना अनेक वर्षांपूर्वी दिल्लीत नाटक करताना पाहिलं होतं.
अमजद खान यांचे वडिल जयंत यांनी देखील अनेक सिनेमांत खलनायकाची भूमिका साकारली आहे. अमजद खान यांनी 1973 साली 'हिंदुस्तान की कसम' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलं आहे. मात्र त्यांना ओळख ही शोलेतील गब्बरनेच दिली, हा सिनेमा 1975 साली प्रदर्शित झाला. गब्बरच्या भूमिकेसाठी अमजद खान यांची भूमिका एका खतरनाक व्यक्तीसारखी केली. अनेकदा तर असं व्हायचं की त्यांना बघून लोकंच घाबरत असतं.