Siddharth Jadhav : लोकप्रिय मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ जाधव हा सोशल मीडियावर सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. सोशल मीडियावर ते अनेक सकारात्मकतेच्या पोस्ट शेअर करताना दिसतो. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत सिद्धार्थ त्याच्या चाहत्यांच्या संपर्कात राहतो. दरम्यान, सिद्धार्थनं नुकताच एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं इंडिगो या विमान कंपनीवर संताप व्यक्त केला आहे.
सिद्धार्थनं हा व्हिडीओ त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवरून शेअर केला आहे. खरंतर सिद्धार्थनं हा व्हिडीओ त्याच्या मुंबई ते गोवा या विमानानं केलेल्या प्रवासानंतर शेअर केला आहे. त्यावेळी प्रवास करताना सिद्धार्थला कसा अनुभव आला याविषयी सांगताना त्यानं संताप व्यक्त केला आहे. सिद्धार्थनं त्याच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडीओत इंडिगो या विमान कंपनीनं प्रवास करत असताना त्याच्या सामानाची अवस्था कशी झाली याविषयी खुलासा केला आहे. या व्हिडीओत सिद्धार्थ म्हणाला की "मी आता इंडिगो फ्लाइटने मुंबईहून गोव्याला आलो आहे. तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने त्यांनी माझ्या सामानाची काळजी घेतली आहे. म्हणजे जवळजवळ त्यांनी फक्त हँडलच बाकी ठेवला आहे. बाकी केअर तर तुम्हाला दिसतच आहे. ज्या पद्धतीने तुम्ही माझ्या सामानाची काळजी घेतली आहे. ते पाहून मला खूप छान वाटलं. आता मी आणखी काय बोलू...वाह."
तर सिद्धार्थनं हाच व्हिडीओ आधीचं ट्विटर म्हणजेच X अकाऊंटवरुनही शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत त्यानं थँक्यू इंडिगो असं कॅप्शन देखील दिलं. त्याची ही पोस्ट पाहिल्यानंतर इंडिगोनं त्याला रिप्लाय केला आहे. इंडिगोनं रिप्लाय देत सांगितलं की "मिस्टर जाधव, तुमची बॅग खराब झाली, हे जाणून घेतल्यानंतर आम्हाला वाईट वाटलं. आम्ही या प्रकरणाची लगेच दखल घेऊ इच्छितो. त्यामुळे तुम्ही कृपया तुमचा फोन नंबर आणि त्यासोबतच तुमच्याशी आम्ही कधी बोलू शकतो यासाठी असणारी सोयीस्कर वेळ DM करु शकका का?" दरम्यान, काही नेटकऱ्यांनी सिद्धार्थची बाजू घेतली आहे आणि इंडिगोचं हे नेहमीचं झालं असं देखील सांगितलं.
Thnx @IndiGo6E pic.twitter.com/ZHqR41EcRO
— SIDDHARTH JADHAV (@SIDDHARTH23OCT) March 13, 2024
हेही वाचा : 'मिस्टर इंडिया'साठी सतीश कौशिक यांनी आमिरला का केलं होतं रिजेक्ट?
सिद्धार्थच्या कामाविषयी बोलायचे झाले तर नुकताच त्याचा 'लग्न कल्लोळ' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याच्यासोबत मयुरी देशमुख आणि भूषण प्रधान महत्त्वाच्या भूमिकेत दिसले.