मुंबई : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक दर्जेदार कथेवर आधारित चित्रपट प्रदर्शित होत आहेत. त्यापैकी एक चित्रपट चाहत्यांचे मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे. अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मृण्मयी देशपांडे ‘मिस यू मिस्टर’चित्रपटात एकत्र झळकणार आहे. चित्रपटामध्ये दोघे मध्यवर्ती भूमिका साकारताना दिसणार आहेत. हा चित्रपट २१ जून २०१९ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. समीर जोशी यांनी चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी पार पाडली आहे. दीपा त्रासि आणि सुरेश म्हात्रे यांनी या चित्रपटाची निर्मिती केली.
चित्रपटाविषयी बोलताना मृण्मयी देशपांडे म्हणाली की, 'मिस यू मिस्टर' मध्ये मी 'कावेरी' नावच्या मुलीची भूमिका साकारत आहे, सध्याच्या काळात अनेक नवरा बायको कामानिमित्ताने एकमेकांपासून लांब राहतात आणि सुट्टीच्या दिवशी एकमेकांना भेटतात. या चित्रपटातदेखील या सर्व गोष्टींमुळे त्यांच्या नात्यांमध्ये होणारे बदल आणि या परिस्थितीला ते कसे सामोरे जातात, याबद्दलची ही पूर्ण प्रेमकथा आहे. जी या चित्रपटाच्या नावातूनच लक्षात येते’.
‘मिस यू मिस्टर’ या चित्रपटाबद्दल बोलताना सिद्धार्थ चांदेकर म्हणाला की ‘ या चित्रपटामध्ये मी ‘वरूण' नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे. समीर जोशी यांनी खूप चांगलं दिग्दर्शन केले. त्यांनी आम्हाला काम करण्याचे पूर्ण स्वतंत्र दिले होते. त्यामुळे हा चित्रपट खूप दर्जेदार झाला आहे आणि तो नक्की प्रेक्षकांना आवडेल अशी माझी खात्री आहे’.
‘मिस यू मिस्टर’ हा एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट असून तो नातेसंबंधांवर बेतलेला आहे. या चित्रपटात इतरही अनेक आघाडीचे मराठी कलाकार दिसणार आहेत. त्यांत राजन भिसे, सविता प्रभूणे, अविनाश नारकर, राधिका विद्यासागर आदींचा समावेश आहे.