अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मंदिरात लग्न लावलं, 15 मिनिटात आटोपला सोहळा

सोनाली कुलकर्णीच्या लग्नाच्या चर्चांना गेल्या अनेक दिवसांपासून उधाण आलं होतं.

Updated: May 18, 2021, 07:55 PM IST
 अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने मंदिरात लग्न लावलं, 15 मिनिटात आटोपला सोहळा

मुंबई : अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने अखेर आपलं लग्न पार पडल्याचं जाहीर केलं आहे. सोनालीने तिच्या या लग्नाची गोष्ट तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. सोनालीने मंदिरात हा लग्न सोहळा अगदी १५ मिनिटात आटोपला आहे. एक तास खरेदी आणि ४ लोकांच्या साक्षीने सोनालीने हा विवाह पार पाडला आहे, ती कोणत्या देशात आहे, कुठे आहे हे तिने उघड केलेलं नाही, पण सासूसासरे आणि आईवडील यांची लग्नाला ऑनलाईन उपस्थिती लाभल्याचं फोटोंवरुन दिसून येत आहे.

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने तिच्या शब्दात सांगितली तिच्या लग्नाची गोष्ट

सोनालीने म्हटलं आहे की, जूनमध्ये लंडनमध्येच आम्ही लग्न करणार होतो, पण लग्नाचं ठिकाण आणि उपलब्धता पाहून जुलै महिन्यातील तारीख ठरली. होणारा नवरा कुणालसोबत बसून लग्नाची तयारी काही प्रमाणात ठरवली.

मार्चमध्ये शुटिंग संपवून मी दुबईला आले, पण भारतात दुसरी लाट आली. मी लग्नबंधनात अडकायला हवं होतं, तिथे मी दुबईत लॉकडाऊनमध्ये अडकली.

विलगीकरण, प्रवासातील मर्यादा, अटी, शर्थी, कुटूंबासाठी त्या दरम्यानचा धोका लक्षात घेता, तसेच एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकारचे कडक नियम यांचा विचार करुन आम्ही भला मोठा विवाह सोहळा रद्द केला.

जूनचं जुलै होतंय, असं म्हटलं तर लग्न सोहळा पुढे ढकलण्याऐवजी जुलैत होणाऱ्या लग्नाचा बार एकदम मे महिन्यातच उडवून दिला आणि सगळ्यांना एक सुखद धक्का दिला.

आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ.

आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही सेलिब्रेशन करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही.

आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणाल चे लंडनला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही...आताच शिक्का मोर्तब करून टाकू.

२ दिवसात सगळं ठरवलं. एका तासात खरेदी आणि १५ मिनिटामध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात, ( इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे).

वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून ( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी) Marriage Certificate वर sign केलं.

इथे सगळ्या process आणि paperwork मध्ये आम्हाला मदत करणाऱ्यांचे आभार.